अकोल्यात शिंदे गटात अंतर्गत बंडखोरीचा भडका उडाला असून कार्यकर्त्यांनी थेट गोपीकिशन बाजोरिया यांचा पुतळा जाळत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला असून एकनाथ शिंदे यांच्यासमोर नेतृत्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
अकोल्यातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाला आता थेट आगीतून उतरवले आहे. अकोल्यात संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार आणि शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात आक्रमक रणशिंग फुंकले आहे. बाजोरिया यांच्या पुतळ्याला आग लावून थेट संघर्षाचं रूप दिलं. ही घटना पक्षातील अंतर्गत वादाच्या संघर्षाचं टोकदार रूप ठरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीविरोधात शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. आकाशवाणी केंद्राजवळ झालेल्या बैठकीत एकमुखी निषेध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत बाजोरिया यांचा पुतळा पेटवून दिला. या घटनेमुळे अकोल्यात तणाव निर्माण झाला असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
वैयक्तिक फायदा
बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. संघटना तोडून स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप बाजरीया यांच्यावर लावण्यात आला. सरकारी निधीचा दुरुपयोग करून खाजगी भूखंडांवर सुविधा निर्माण केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांना मदत केली. गोपीकिशन बाजोरिया यांच्यावरील या आरोपांनी वातावरण अधिकच तापले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे. एकीकडे विश्वासू संपर्क नेते, दुसरीकडे रस्त्यावर उतरलेले आणि आक्रमक झालेलं स्थानिक नेतृत्व. शिंदेंनी जर वेळेवर हस्तक्षेप केला नाही, तर अकोल्यात शिवसेना शिंदे गटाचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही महिन्यांत भाजपातील असंतुष्ट नेते शिवसेनेत दाखल झाले आणि थेट पदं मिळवली. यामुळे पारंपरिक शिवसैनिकांमध्ये असंतोष आहेच. त्यात आता बाजोरिया यांचा स्वार्थ आणि काँग्रेसशी लागेबांधे उघड झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता अधिकच वाढली आहे.
शिंदे यांच्यापुढे आव्हान
या स्फोटक घडामोडीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष एकनाथ शिंदेंकडे लागले आहे. शिंदे बाजोरिया यांना वाचवतात की कार्यकर्त्यांचा राग शांत करतात, हे पाहणं रंजक ठरेल. कोणता निर्णय घेतला जातो, हे अकोल्यातील आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम घडवू शकतो. “बाजोरिया हटाव” ही आता केवळ घोषणा राहिलेली नाही, ती शिवसैनिकांच्या मनातील जळती ज्वाळा बनली आहे. ती ज्या दिवशी नेतृत्वाच्या दिशेने धावेल, त्या दिवशी शिंदे गटासाठी अकोल्यात माघार अपरिहार्य ठरेल.