
नागपूर आता केवळ संत्र्यांचे नव्हे, तर भारताच्या डिजिटल भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब बनत आहे. महायुती सरकार आणि आयबीएम यांच्यातील ऐतिहासिक करारामुळे विदर्भात डिजिटल क्रांतीची नवी दारे उघडली जात आहेत.
महाराष्ट्रातील नागपूर शहर आता डिजिटल भारताच्या नकाशावर एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. राज्यातील महायुती सरकारने प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि IBM टेक्नोलॉजीज यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

शासनाच्या या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि विशेषतः नागपूरमध्ये AI कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये हे केंद्र उन्नत AI संशोधन आणि ‘MARVEL’ कार्यान्वयन तंत्रज्ञानासाठी उभारले जाणार आहे. हे केंद्र नागपूरला डिजिटल विकासाचा हब बनवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
नागपूर आधीपासूनच स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध डिजिटल प्रकल्प राबवत आहे. शहरात ई-गव्हर्नन्स सेवा, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, पब्लिक वायफाय झोन, डिजिटल क्लासरूम्स आणि आरोग्य क्षेत्रात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोठी प्रगती झालेली आहे. आयबीएम सह झालेल्या करारामुळे ही वाटचाल आणखी वेग घेणार आहे. नागपूरमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
Vidarbha : ग्रामपंचायत अधिकारी आता राज्यस्तरीय सन्मानाचे मानकरी
AI संशोधन केंद्राचे महत्त्व
नागपूरमध्ये उभारण्यात येणारे AI संशोधन केंद्र हे राज्यातील पहिले प्रगत AI प्रयोगशाळा असेल. जेथे MARVEL (Modular & Reusable Virtual Enabled Lab) आधारित प्रकल्प राबवले जातील. या केंद्रामार्फत शासकीय प्रशासनातील अनेक कामे, नागरिक सेवा वितरण, माहिती विश्लेषण, सायबर सुरक्षेची जोखीम ओळखणे, निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद करणे, अत्याधुनिक पद्धतीने पार पाडली जातील. या प्रकल्पामुळे केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात डिजिटल कौशल्यांच्या संधी खुल्या होतील. IBM च्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि युवकांना AI, सायबर सुरक्षा, क्लाउड टेक्नॉलॉजी यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे विदर्भातील तरुणांसमोर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
नागरिक-केंद्रित दृष्टिकोन
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध सेवांना अधिक प्रभावी, जलद, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित बनवणे. वर्च्युअल असिस्टंट्स, एजेंटिक AI प्रणालींच्या सहाय्याने सरकारी प्रक्रिया सुलभ होतील, तसेच सामान्य नागरिकांना वैयक्तिक सेवा मिळतील. विशेष बाब म्हणजे AI मॉडेल्सचे स्वामित्व व नियंत्रण संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडे राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला चालना दिली आहे. मेट्रो, आयटी पार्क्स, लॉजिस्टिक हब, आणि डिजिटल हेल्थकेअर यासारख्या प्रकल्पांमुळे नागपूर आता केवळ विदर्भाचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याचे केंद्रबिंदू बनत आहे.
ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भाला नवसंजीवनी मिळणार आहे. हे केंद्र केवळ तांत्रिक नवकल्पनांचं केंद्र नसून, रोजगार, संशोधन, उद्योजकता आणि सामाजिक परिवर्तनाचं केंद्र ठरेल. विदर्भाचा हा डिजिटल पुनर्जन्म देशासाठी एक उदाहरण ठरणार आहे. नागपूर आता केवळ संत्र्यांचं नव्हे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचंही शहर होणार.