महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!

Ajit Pawar : बळीराजापासून तरूणाईसाठी कोट्यवधींचा निधी

Author

अंगावरचं जॅकेट बदलत अजितदादांनी अख्ख्या महाराष्ट्रावर गुलाबी जादू केली. आता महायुतीच्या सरकारमध्ये दादा पुन्हा एकदा खजीना सांभाळणारे ‘कुबेर’ झाले आहेत. लवकरच ते महायुती सरकारसाठी महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासाठीचं अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दादांची कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एखाद्या स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील महायुतीच्या यशामागं त्यांच्या लाडक्या बहिणींचा हात आहे. बहिणींची मोलाची साथ मिळाली अन् महायुती सत्तारूढ झाली. महायुती सरकारनं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी विशेष योजना आणली. जनतेनेही ही योजना स्वीकारली. या विश्वासाच्या बळावर महायुतीने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. महाविकास आघाडीला या योजनेवर स्वार होत महायुतीनं धूळ चारली. निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीनं बाजी मारली.

सत्तेवर आल्यानंतर महायुती केवळ घोषणा करून थांबली नाही. राज्यातील जनतेसाठी एकापाठोपाठ एक योजना आणणे त्यांनी सुरू केलं. प्रत्येकाशी विश्वासाचं नातं जोडण्यास सुरुवात केली. अशातच आता केंद्र सरकारनंतर सगळ्यांच्या मनाला भावेल असं राज्याचं ‘बजेट’ सादर करण्याचं आव्हान महायुतीला स्वीकारावं लागणार आहे. महायुतीच्या महाखजीन्याचे कुबेर म्हणून अजित पवार ही जबाबदारी पेलणार आहे. अजितदादा अर्थसंकल्पाच्या दिवशी एक जादूची पेटी घेऊन येणार आहेत. या पेटीतून काय काय निघणार, याची प्रतीक्षा आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या विकासाला संजीवनी मिळेल का? याची उत्सुकता आता आहे.

Parinay Fuke : गुरूजनांच्या हक्काच्या लढ्याला मिळालं यश

प्रतीक्षा संपणार

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासा पहिला दिवस आटोपला आहे. पहिल्या दिवशी अजितदादांनी जोरदार सुरुवात केली. राज्याच्या हितासाठी आर्थिक तरतूदींची पेटी त्यांनी खुली केली. त्यांच्या घोषणांनी शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरिक, उद्योजकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. विरोधकांनी आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. कोणी हातात बेड्या घालून निषेध नोंदवला. कोणी वादग्रस्त विधानं करत आपली भूमिका मांडली. मात्र, या साऱ्या घडामोडींमध्ये अजितदादांनी आपल्या अनोख्या शैलीत आर्थिक तरतूदींचा पाऊस पाडला. आपली ‘दादा’गिरी त्यांनी पुन्हा दाखवली.

पहिल्या दिवशी तब्बल 6 हजार 486.20 कोटी रुपयाच्या निधीची त्यांनी तरतूद केली. यातून ग्रामीण भागातील घरे, कृषिपंपांसाठी वीज सवलत मिळणार आहे. रस्ते विकास होणार आहे. लोकहिताची अनेक कामे होणार आहेत. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना, आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी हा निधी वापरला जाणार आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेलाही पाठबळ मिळालं आहे.

राज्यातील विविध प्रकल्पांसाठी या निधीचं वाटप करण्यात आलं आहे. 932.54 कोटी रुपये अनिवार्य मागण्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 3 हजार 420.41 कोटी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसाठी 2 हजार 133.25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक तरतूदींमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. अजितदादांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजनेअंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत देण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळणार आहे. दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी त्यातून मिळणार आहे.

विकासाच्या दिशेने पाऊल  

अजितदादांनी वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केले आहे. पुणे रिंग रोड, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग यासाठी निधी दिला आहे. आता दादांनी पुरविणी मागण्यांमध्ये बाजी मारली आहे. मुख्य अर्थसंकल्प सादर करताना दादा आपल्या जॅकेटच्या खिशांमधून कोणासाठी कोणती योजना आणतात याची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारप्रमाणं राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प देखील तितकाच महत्वाचा आणि गेमचेंजर ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्याची पायाभरणी या अर्थसंकल्पातून होईल, असं सांगण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!