महाराष्ट्र

Anna Bansode : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा झेंडा

Maharashtra : राजकीय शर्यतीत कोणीच प्रतिस्पर्धी नाही

Author

महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरात सुरू आहे. गेल्या अनके दिवसांपासून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती हा चर्चेचा मुख्य मुद्दा ठरला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच या पदासाठी चर्चा रंगली असली तरी अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत, आता विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहे. 25 मार्च हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपल्या उमेदवाराची निवड निश्चित करत अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीचे संकेत मिळत आहेत. महायुतीकडे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षपद स्वीकारल्याने उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे.

 

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांसारखी प्रमुख मंडळी उपस्थित होती. 25 मार्च 2025 हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीने या पदासाठी उमेदवार दिला नसल्याने अण्णा बनसोडे यांची निवड बिनविरोध होईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावरही त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास, 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकमध्येही विजय मिळवला आहे. यामुळे, पिंपरी मतदारसंघात त्यांचा दबदबा अधिक वाढला आहे. महायुतीकडे विधानसभेत स्पष्ट बहुमत असल्याने, अण्णा बनसोडे यांच्या निवडीला कोणतीही अडचण येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडेट्टीवारांची मागणी

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, ही नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. संख्याबळाच्या गणिताकडे न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड लवकरात लवकर करावी, असे वडेट्टीवार यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!