
अमरावतीच्या आकाशात विमान उडताना अकोल्याचे लोक जमिनीवर उभं राहून फक्त टाळ्या वाजवत राहिले. अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं अकोलेकरांचं आणखी एक स्वप्न अपूर्णच आहे.
आश्वासनांची पोतडी खांद्यावर टांगून फिरणाऱ्या अकोल्याच्या लोकप्रतिनिधींनी अमरावतीनं पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. विकासाच्या बाबतीत पुन्हा एकदा अमरावतीनं स्पीड पकडली आहे. अकोल्याच्या पाठीमागून येत मॉडेल रेल्वे स्थानकाची इमारत अमरावतीनं मिळवली. आता त्यात हवाई वाहतुकीची भर पडली आहे. त्यामुळं अकोलेकरांच्या हवाई वाहतुकीच्या स्वप्नांना पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. अकोल्यातील नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना विमानतळाचे ‘लॉलीपॉप’ दाखविले आहे. हे चॉकलेट पुन्हा एकदा कायम राहिले आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही सरकारी विभागांना शिवणी विमानतळाबाबत तोडगा काढता आलेला नाही. उलट अमरावीतून विमानसेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थाटात उद्घाटनही केले आहे. त्यामुळं अकोल्यातील नेते पुन्हा एकदा केवळ ‘होणार, होणार’चा पाऊस पाडत बसले आहे. मात्र प्रत्यक्षात नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्यानं अकोल्याचं विमान ‘टेकऑफ’पूर्वीच पंक्चर झालं आहे. तसंही अकोल्यातून हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यापेक्षा अमरावतीमधून नागपूरमार्गे हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परिणामी सरकारी यंत्रेणेनं देखील अकोल्याच्या नावापुढं फुली मारत अमरावतीला प्राधान्य दिल्याचेच दिसत आहे.
मूर्ख बनविण्याची मर्यादा
अकोल्याच्या वाट्याला मॉडेल रेल्वे स्टेशन, रेल्वेचे डिव्हिजन, पिण्याचे पाणी, स्वच्छ मोर्णा नदी, सुसज्ज उड्डाणपूल, सुरळीत अंडरपास यांच्याबाबतीत पनवतीच आली आहे. अकोल्यात अनेक वर्षांपासून विमानतळ आहे. अनेक वर्षांपर्यंत या विमानतळाच्या धावपट्टीवर शिवणी, शिवर, एमआयडीसी, बोरगाव मंजु भागातील मुलं सायकल चालवायचे. क्रिकेट खेळायचे. रात्रीच्या सुमारास विमानतळावरील खोल्यांचा अनैतिक कामासाठी वापर सुरू झाला. कालांतरानं अचानक सरकारनं खुप काही केल्यासारखं दाखवलं. विमानतळ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यात दिलं. एएआयचं कर्मचारी विमानतळावर आले. पण विमानसेवा मात्र आजपर्यंत आली नाही.
पश्चिम विदर्भातील महत्वाचं शहर असलेलं अकोला जसं विकासाच्या बाबतीत कमनशिबी ठरलं, तसंच विमानसेवेबाबतही. अकोल्यात धड रस्ते नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. सातत्यानं दंगली घडतात. अकोलेकरांची तहान भागवायला पुरेसं पाणीही नाही. मोर्णा नदीचं प्रशासनानं गटार केलं आहे. शहरभरातील रस्त्यांवर कचऱ्याचा सडा पडलेला असतो. पथदिवे बंद असतात. विकासाच्या नावाखाली अकोल्यात फक्त भोपळाच आहे. अनेक वर्ष सत्ता भोगणारे लोकप्रतिनिधी अकोल्यासाठी काहीच करू शकलेले नाहीत. केवळ धर्म, आध्यात्म, शोभायात्रा, आरोप-प्रत्यारोप यांच्या नावावर मतदारांना मुर्ख बनविले जात आहे. विकास मात्र शून्य आहे.
अकोल्याच्या विकासाला लागलेल्या ग्रहणाची अवदसा अशी आहे की, अमरावतीच्या विमानतळ लोकार्पणासाठी या भागातील नेत्यांनाही निमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. अकोल्याचं विमानतळ ‘होणारच’ अशा गप्पा नेत्यांनी मारल्या. पत्रकार परिषदेत घेतली गेली. आश्वासनांचे फटाके उडविले. मात्र कल्पनांच्या कागदाचं हे विमान आता क्रॅश झालं आहे. विमानतळ सुरू झालं तरी आता अकोला जिल्ह्यातून किती प्रवासी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी सरकारी यंत्रणा आता मोकळी झाली आहे.
आणखी एक शब्द
अमरावतीचं विमानतळ सुरू झाल्यानंतर अकोल्यात प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे हेरलं. अकोल्याच्या विमानतळाबाबत त्यांनी भाषणात आवर्जून उल्लेख केला. तो केवळ जनतेचा राग शांत करण्यासाठी होता, अशी भावना आता व्यक्त होत आहे. हवाई वाहतूक धोरणानुसार दोन विमानतळांमधील अंतर, प्रवाशांची संख्या आणि आर्थिक गणितं याकडं मात्र दुर्लक्ष करता येणार नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विकासाच्या बाबतीत अमरावती सुरुवातीपासून आघाडीवर होती. आजही पुढेच आहे. अकोल्याचं नाव आजही शेवटी कुठं तरी होतं आजही तिथंच आहे. त्यामुळं आतातरी अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी जागं व्हावं. विकास करावा. अन्यथा अकोला पश्चिम प्रमाणं पुढं येणारी प्रत्येक निवडणूक अवघड होत जाईल, यात दुमतच नाही.
Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान