
मदरशातील शिक्षणसंस्थेच्या आड लपलेलं फसवणुकीचं जाळं अखेर उघडकीस आलं आहे. पुसदच्या माहूर रस्त्यावरील मदरशावर अकोला दहशतवादविरोधी पथकाने केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
धार्मिक शिक्षणाच्या आड दानदात्यांची फसवणूक करणाऱ्या मदरशाच्या चालकावर अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने कठोर कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. माहूर रोडवरील एका मदरशावर ही कारवाई 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि तपासाचा अंतिम टप्पा 13 मे 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण झाला. या दरम्यान पथकाने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करून फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे.
अकोल्याचे दहशतवादविरोधी पथक (ATS) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथील गढी वॉर्डातील उर्दू हायस्कूलजवळ राहणारा मोबीन शेख मेहबूब (वय 37) या व्यक्तीने फसवणूक केली आहे. मदरशाच्या नावाखाली जनतेकडून आर्थिक मदतीच्या स्वरूपात QR कोड, खाते क्रमांक व पॉम्पलेट्सद्वारे निधी जमा करत फसवणूक केल्याची तक्रार पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे यांनी दाखल केली. 13 मे रोजी दुपारी तपास आणि पंचनामा केल्यानंतर मोबीनविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

लक्ष्य ठेवून होते
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील काही स्वयंसेवी संस्था, फ्रन्ट ऑर्गनायझेशन्स आणि संशयित व्यक्ती दहशतवादी विचारप्रणालीशी संबंधित असल्याच्या पार्श्वभूमीवर ATS सतत नजर ठेवून होती. त्याच दरम्यान, पुसद येथील जामिया अशरफिया अँड वेलफेअर सोसायटी या नावाने चालवल्या जाणाऱ्या मदरशावर संशय घेण्यात आला. या संस्थेत 10 ते 18 वयोगटातील मुलांना धार्मिक व इस्लामिक शिक्षण दिले जाते.
Election Commission : पक्ष स्थापनेला लागणार आता जनतेची संमती
विशेष म्हणजे, या संस्थेकडून छापण्यात आलेल्या पॉम्पलेट्स व कॅलेंडरमध्ये “पुसद शहर में पहली बार मदरसा तहफिज-उल-कुरआन शाहीन अकॅडमी का आगाज” अशा मथळ्याखाली डॉ. हाफिज मोबीन अहमद सिराज, डीएनवायएस बीईएमएस यांचे नाव नमूद होते. या छपाईत नोंदणी क्रमांक 554/एफ 16429 तसेच अॅक्सिस बँकेचे खाते क्रमांक, IFSC कोड व QR कोड यांचा समावेश होता. याच QR कोडच्या माध्यमातून निधी गोळा केला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली.
दानदात्यांची दिशाभूल
या माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी पथकाने प्रत्यक्षात पॉम्पलेट व कॅलेंडर प्राप्त करून त्यांचे बारकाईने परीक्षण केले. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुसंगती नसल्याचे निदर्शनास आल्याने कारवाईस सुरुवात करण्यात आली. प्राथमिक तपासणीत दानदात्यांची दिशाभूल करून स्वतःचा फायदा घेण्याचा प्रकार उघडकीस आला.
Nagpur : स्मार्ट सिटीचा स्मार्ट पूल ठरतोय अपघाताचं इन्व्हिटेशन
या घटनेमुळे पुसद परिसरात खळबळ माजली असून, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी संस्थेच्या इतर व्यवहारांचीही चौकशी सुरू केली आहे. धार्मिक शिक्षणाच्या नावावर दहशतवादी विचारसरणी किंवा फसवणुकीचे जाळे पसरवण्याचा प्रकार गंभीर असून, यावर कठोर कारवाईची मागणी आता अधिकच जोर धरत आहे. पुढील तपास पुसद पोलिस व अकोला ATS संयुक्त पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाची गुंतवणूक आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.