महाराष्ट्र

Akola BJP : माईकवर ओरडून उड्डाणपूल होत नाही

New Tapdia Nagar : भाजपने काढली शिवसेना ठाकरे गटाची खरडपट्टी

Post View : 55

Author

विरोधकांनी उड्डाणपुलाच्या कामावरून भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड फेकू नयेत, असा टोला लगावत त्यांनी विकासकामांचा ठोस पुरावा मांडला.

हिंगणीतील पाणीप्रश्न आणि न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या संदर्भात भाजप लोकप्रतिनिधींवर आरोप करणाऱ्या विरोधकांना भाजपचे महानगर अध्यक्ष जयंत मसने, माजी नगरसेवक सागर शेगोकार आणि हरीश काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अधुरी माहितीवरून आरोप करणे म्हणजे अकलेचे तारे तोडण्यासारखे आहे. काचेच्या घरात राहून इतरांवर आरोप करताना सावध राहा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खरडपट्टी काढली.

जयंत मसने यांनी स्पष्ट केले की, न्यू तापडिया नगर भागातील उड्डाणपूल ही मागणी केवळ भाषणांत मर्यादित न राहता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली आणि त्या कामाला गती दिली. खासदार संजय धोत्रे यांच्या मागणीनंतर हे काम हाती घेण्यात आले, जे सध्या प्रगतीपथावर आहे. विकासाच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या अडथळ्यांना ओळखा, पण खोट्या आरोपांत वेळ घालवू नका, असा टोला त्यांनी लगावला.

ठाकरेंनीच दिला नव्हता निधी

उड्डाणपूलाच्या कामास विलंब झाल्याबाबतही भाजप नेत्या त्रिकुटाने महाविकास आघाडी व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीका केली. त्यांच्या कार्यकाळात निधी न मिळाल्यामुळेच हे महत्त्वाचे काम रखडले. आज जे खोटे आरोप करत आहेत, त्यांचेच सरकार तेव्हा सत्तेत होते. मग निधी का दिला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Akola : भाजप, राष्ट्रवादी न सेना; लोकांचे प्रश्न कुणी गांभीर्याने घेईना

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या अॅप्रोच रोडच्या कामावरून काही विरोधकांनी आरोप केल्यावर, भाजपने त्यावर स्पष्टीकरण दिले की, हा रस्ता 400 फुटांचा असून पहिला थर टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी 10 ते 20 फूट अंतरावर तडे गेल्याचे निदर्शनास आले, पण हा केवळ पहिला थर आहे. अजून पाच थर टाकले जाणार आहेत. ही माहिती न घेता आंदोलन करण्याचा खोटा बहाणा करणाऱ्यांवरही टीका करण्यात आली.

विरोधकांना सवाल

सागर शेगोकार आणि हरीश काळे यांनीही भाजपविरोधकांवर निशाणा साधत, प्रथम तुम्ही दहीहंडा परिसरासाठी काय विकास कामं केलीत ते सांगा. त्याचा अभ्यास करा आणि मग भाजपवर आरोप करा, असा सल्ला दिला. त्याचबरोबर भाजपनेते जयंत मसने यांनी इशाराही दिला की, पुढे जर असाच प्रकार सुरु राहिला, तर आम्हीही पोलखोल करणार. गडकरी आणि फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही.

भाजप नेत्यांनी हा मुद्दा देखील मांडला की, न्यू तापडिया नगरचा विकास हे भाजपचे दीर्घकालीन स्वप्न आहे, ज्याची सुरुवात दिवंगत मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केली होती. त्या काळात या भागात रस्तेही नव्हते. मात्र भाऊसाहेबांनी निधी देऊन पायाभरणी केली. आज त्याच वाटेवर चालत आम्ही हा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत आहोत, असे सांगत त्यांनी जनतेचा विश्वास कायम असल्याचे अधोरेखित केले.

खोट्या आरोपांचा आधार

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही विरोधक अपयशाची छाया पाहत असल्याने निराश होऊन असंख्य आरोप करत आहेत, असा दावा करत जयंत मसने म्हणाले, मतदारांनीच त्यांचा पोल उघड केला आहे. त्यामुळे आता ते खोट्या प्रचाराची शिदोरी घेऊन मैदानात उतरले आहेत. पण जनता ही साक्षी आहे की विकासासाठी कोण काम करतंय आणि कोण फक्त आरोप करतंय.

न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचं काम हा फक्त एक प्रकल्प नाही, तर अकोल्याच्या विकासाची दिशा दर्शवणारा एक टप्पा आहे. पाणीप्रश्नापासून रस्त्यांपर्यंतचा प्रत्येक मुद्दा हाताळताना भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन नाही, तर कृती करून दाखवली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळं उठतीलच, पण शेवटी जनतेचा विश्वास, विकासासाठीच झटणाऱ्यांनाच मिळतो आणि अकोल्यात तो भाजपाच्या पाठीशी दिसतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!