अकोला जिल्ह्यातील दुर्गवाडा बसस्थानक ते मुख्य चौक रस्ता खड्डेमय आणि पाण्याने साचलेला असल्यामुळे नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनस्वार मोठ्या त्रासात आहेत.
भारताची प्रगती जगभर दिसते, पण महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भाग अजूनही विकासाच्या मागोमागल्या वाटेवर आहेत. पश्चिम विदर्भात, जिथे विकासाच्या गप्पा नेहमीच गाजतात, पण प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. विशेषत: पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा हा या परिस्थितीचे ज्वलंत उदाहरण आहे. येथे रस्ते, पूल, पाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना रोजच ताण सहन करावा लागतो. विकसित महाराष्ट्राची ग्वाही देणाऱ्या सरकारच्या घोषणांवर स्थानिक नागरिकांचा विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे.
विदर्भाचे नाव घेतले की अनेकदा येणारी प्रतिमा म्हणजे खडतर रस्ते, पाण्याची समस्या आणि नागरिकांचा त्रास. अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्ते इतके खराब झाले आहेत की दररोजच्या दैनंदिन जीवनात नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक सुरळीत होत नाही. तर पादचारी आणि वाहनस्वारांसाठी हा प्रवास धोकादायक ठरतो. अकोल्यातील दुर्गवाडा बसस्थानक ते मुख्य चौकापर्यंतचा रस्ता हा आता खड्ड्यांचा ‘महासागर’ बनला आहे. पावसाळ्यात तर येथील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता नव्हे, तर जणू नदीच वाहत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
Congress : अरेच्चा! पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये आता केवळ ॲडमिनच उरलाय
प्रशासनाकडून दुर्लक्ष
शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना रोज याच रस्त्यावरून जीव धरून प्रवास करावा लागतोय. अकोलेकरांचे म्हणने आहे, ‘आम्ही मतं देतो, पण विकास कुठे आहे? हा रस्ता म्हणजे दुर्गवाडा गावाचा जीवनवाहिनी आहे. गावात येण्या-जाण्याचा हा एकमेव मार्ग. पण सध्या याची अवस्था इतकी बिकट आहे की, रस्त्यावरून चालणे म्हणजे एखाद्या साहसी खेळात सहभागी होण्यासारखे आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि त्यातून वाहने घसरण्याची भीती. यामुळे ग्रामस्थांचा संयम आता सुटत चाललाय. आम्ही रोज त्रास सहन करतो, पण कोण ऐकणार? असा सवाल गावकरी विचारत आहेत.
स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या या समस्येकडे कोण लक्ष देणार?या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांचा रोजचा प्रवास हा जणू एखाद्या साहसी चित्रपटातील सीनसारखा झाला आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला याच मार्गावरून जावं लागते. पण प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. स्थानिक नागरिक श्रीनेश धामणे यांनी तर थेट जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुर्तिजापूर यांच्याकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. आम्हाला फक्त आश्वासने नको, प्रत्यक्ष कृती हवी असं त्यांनी ठणकावून सांगितले.
