अकोल्यात ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबच्या चित्रावर दूध अभिषेक केल्याने शहरात वाद उडाला. या घटनेवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दर्शवली आहे.
अकोला शहरात नुकताच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही सण उत्साहात साजरे झाले. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, अनंत चतुर्दशीला कोणताही गोधळ होऊ नये आणि दोन्ही सण शांततेत साजरे व्हावे यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणून तीन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही समुदायांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या सणांचा आनंद लुटला. पण, अकोल्याच्या त्या शांत रस्त्यांवर अचानक एक वादळ निर्माण झाले. ज्याने शहराच्या शांततेच्या चित्राला धक्का दिला. ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत, तिलक रोडवरील कापड बाजार चौकात एक धक्कादायक घटना घडली. काही तरुणांनी औरंगजेबच्या चित्राला दूधाने अभिषेक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओत ‘तानाजी’ चित्रपटातील औरंगजेबच्या पोस्टरला दूध अर्पण करताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या एका व्हिडीओत काही तरुण औरंगजेबच्या चित्रासह मिरवणुकीत नाचताना दिसले. हरिहर पेठ आणि शीतला माता मंदिर चौकातही अशी पोस्टर्स दिसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाने अकोला पोलिसांना तातडीने कारवाईसाठी भाग पाडले. पोलिसांनी सय्यद शारीक सय्यद जमीर, शेख आसीफ शेख अलताफ आणि मोहीन खान मतीन खान यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे. इतर काही अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
सामाजिक तणाव वाढले
शहर कोतवालीचे पोलिस निरीक्षक संजय गवई, उपनिरीक्षक अनिल इंगोले आणि त्यांच्या पथकाने तपासाला गती दिली आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट यावर आक्रमक झाली आहे. त्यांनी 14 सप्टेंबर 2025 रोजी, रविवारी दुपारी 3 वाजता तिलक रोडवरील कन्हैया ड्रेसेस येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला गंगाजल अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, शहरप्रमुख रमेश गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम आहे, असे शिवसेनेने सांगितले. हा कार्यक्रम केवळ निषेधाचा नाही, तर धार्मिक सौहार्द आणि इतिहासाच्या जखमांवर मलम लावण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, क्रूर औरंगजेबच्या फोटोला अभिषेक करणाऱ्या समाजकंटकांना उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. दरम्यान आंदोलनात ‘जय संभाजी महाराज, संभाजी महाराज अमर असो’ असे नारे देखील लावण्यात आले. ज्या ठिकाणी इसमांनी औरंगजेबाच्या बॅनरवर दूध चढवले होते. त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी गंगाजल शिंपले. या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत अनेक नागरिकांनी देखील हजेरी लावली. अकोला हे शहर कधीकाळी दंगली आणि भांडणांसाठी कुप्रसिद्ध होते. पण गेल्या काही वर्षांत येथील चित्र बदलत आहे. शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहराच्या शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
Maharashtra : महायुतीच्या ‘आका’ कारभारावर बच्चू कडूंचा प्रहार
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिरवणूक मार्गाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई सुरू आहे. या प्रकरणाने अकोल्याच्या सामाजिक ताण्याला नवे वळण दिले आहे. एकीकडे सणांचा आनंद साजरा करणारे शहर, दुसरीकडे धार्मिक भावना भडकवणाऱ्या घटनांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अशा कृत्यांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
