महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धुमशान सुरू झाली आहे. आरक्षण सोडतीने सर्वांचे डोळे दिपवले असताना, अनेक नेत्यांच्या महत्वाकांक्षांना धक्का बसला. तर काहींना नव्या संधींचे दरवाजे उघडले. अकोला जिल्ह्यातही राजकारण तापू लागले आहे. नुकताच जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आरक्षणाची यादी समोर आली. यात कुरणखेड मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठरल्याने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या नजरा या जागेवर खिळल्या आहेत. हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, विद्यमान खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांचा पारंपरिक बालेकिल्ला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी येथे विजयाची माळ गळ्यात घातली आहे. येत्या निवडणुकीत या जागेवर ओबीसी आरक्षण लागू झाल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांची झोप उडाली आहे. प्रत्येक पक्ष पार्सल उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. जणू काही युद्धभूमीवर सैन्य सज्ज होत आहे. काही वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीत सुशांत बोर्डे यांनी भाजपच्या कमलाकर गावंडे यांचा थोडक्यात पराभव केला होता. तेव्हा काँग्रेसच्या उमेदवारानेही चांगली मते मिळवली आणि निवडणूक रंगतदार झाली. आता जवळपास 18 हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. ज्यामुळे येथे राजकीय गणिते जुळवणे म्हणजे जणू चेसचा खेळ.
वर्चस्व कोणाचे?
वंचित बहुजन आघाडीसाठी हा मतदारसंघ ‘गड’ म्हणून ओळखला जातो. पण यावेळी कोण या गडाला सुरुंग लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनगर समाजाला संधी देण्याच्या चर्चा आहेत. ज्यामुळे वंचितच्या नेत्यांमध्ये उत्साह आहे. भाजपकडून स्थानिक आणि पार्सल उमेदवारांच्या नावांची राळ उडत आहे. माजी पंचायत समिती सदस्य पती, भाजप कुरणखेड मंडळ अध्यक्ष प्रशांत ठाकरे जे आमदार हरीश पिंपळे यांचे निकटवर्तीय आणि संघाचे स्वयंसेवक आहेत. पळसो बढे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, भाजप अकोला तालुका सरचिटणीस, आत्मा समिती अध्यक्ष जयकृष्ण ठोकड हे दोघेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या दोघांचा जनसंपर्क जबरदस्त आहे.
भाजप पार्सल उमेदवार उतरवून सरप्राइज देण्याच्या मूडमध्ये आहे. ज्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र होणार. वंचित बहुजन आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, माजी सदस्य सुशांत बोर्डे, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन उर्फ वसंतराव नागे आणि धनगर समाजाचे युवा नेते सुमित नवलकर हे संभाव्य उमेदवार आहेत. हे सर्वजण मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी धनगर समाजाच्या पाठबळाने वंचितचा गड अजिंक्य राहणार की नाही, हे पाहणे रोचक ठरणार. दुसरीकडे, शिवसेना, उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवार उतरतील. या निवडणुकीत सर्व पक्षांच्या उमेदवारांची गर्दी असल्याने रंगत वाढली आहे. ओबीसी आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहे, पण जुने दिग्गजही मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत.
