महाराष्ट्र

Amol Mitkari : टाळ-मृदुंगाच्या गजरात आमदाराने केले गणरायाचे स्वागत

Ganeshotsav : सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी मिटकरींचे बाप्पाला साकडं

Post View : 43

Author

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावनेत गणपती बाप्पाचे स्वागत केले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा गणेशोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून गणरायाचे आगमन महाराष्ट्रात थाटामाटात झाले आहे. गजानन श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया, विघ्नहर्ता सर्व विघ्न हरून घे, अशी प्रार्थना करत प्रत्येक घरात, गल्लीबोळात आणि मनामनात बाप्पाचे स्वागत होत आहे. टाळ-मृदंगांचा नाद, फुलांच्या माळांनी सजलेली मंडपे आणि भक्तिमय वातावरण यामुळे महाराष्ट्र गणेशमय झाला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत, अगदी पंतप्रधानांपर्यंत सर्वच नेते आपापल्या निवासस्थानी बाप्पाचे स्वागत करताना दिसत आहेत. 

अकोल्यातही हा उत्साह कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी टाळ-मृदंगांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले.  पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा ? बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा, अश्या गजरात त्यांनी हा उत्सव साजरा केला. गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबात बाप्पाचे आगमन होत आहे. यंदाही भक्तिमय वातावरणात त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. शेतकऱ्यांवरील अवकाळी पावसाचे संकट लवकर दूर होऊ दे, महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् राहो आणि कोणतेही संकट येऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाचरणी केली.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उत्साह

पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरत आहे, असे मिटकरी यांनी सांगितले.यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिकच नाही, तर राजकीय रंगांनीही रंगला आहे. कारण, राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेते बाप्पाला खुश करण्यात मग्न आहेत. या निवडणुकीत यश मिळू दे, अशी साकडे घालत नेते शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातही महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अमोल मिटकरी यांनी यंदाच्या गणेशोत्सवातून निवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी सुरू केली आहे.

मिटकरी यांची रोखठोक आणि थेट वक्तव्य करण्याची शैली नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते कोणती खेळी खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिटकरी यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संदेशही दिला. पर्यावरणपूरक मूर्ती, कमी आवाजाचे उत्सव आणि सामाजिक एकतेचा संदेश यंदाच्या उत्सवातून पुढे येत आहे. अकोल्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि निवडणुकीची धामधूम एकत्र आली आहे. गणरायाच्या आशीर्वादाने मिटकरी आणि इतर नेते आपापल्या पक्षाच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. हा उत्सव केवळ धार्मिकच नाही, तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.

गणरायाच्या चरणी साकडं घालताना प्रत्येकजण आपापल्या मनोकामना पूर्ण होण्याची आशा बाळगतोय. यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!