कधीकाळी गुन्हेगारीच्या सावटाखाली वावरणारे अकोला शहर आता शांततेचा श्वास घेत आहे. अकोला जिल्ह्याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस टीमने एक नवीन आणि प्रभावी प्रयोग राबवला आहे.
अकोला शहर, जे एकेकाळी शांततेचे प्रतीक होते, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या काळ्या सावटाखाली दबले आहे. दंगल, खून, चोरी आणि टोळी युद्धांनी शहराचे नाव काळवंडले. पण आता या अंधाराला उजेडाची किरणे दाखवण्यासाठी एक नवे योद्धा मैदानात उतरले आहे. ते म्हणजे अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक. त्यांनी जणू काही शपथच घेतली आहे की, अकोल्यातून गुन्हेगारीला कायमच मिटवायचे. त्यांच्या या निर्धाराला आता एक नवी दिशा मिळाली आहे. त्यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
कृषी नगर परिसरात नुकत्याच झालेल्या एका भयंकर गॅंगवॉरने अकोल्याचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले होते. दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत तलवारी, लोखंडी पाईप, कु-हाडी आणि अगदी बंदुकींचाही वापर झाला. रक्तरंजित रस्ते आणि जिवंत काडतुसे यांनी घटनास्थळाचा थरकाप उडवला. पण यावेळी पोलिसांनी मागे हटण्याऐवजी गुन्हेगारांना कठोरपणे चाप लावला. सिव्हिल लाईन पोलिसांनी तब्बल 17 गुन्हेगारांवर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली. ज्यामुळे अकोल्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. या गॅंगवॉर प्रकरणात पोलिसांनी शुभम विजय हिवाळे या टोळीप्रमुखासह त्याच्या 16 साथीदारांना ताब्यात घेतले.
शांततेसाठी कडक पावले
शुभम हिवाळे हा अकोल्यातील गुन्हेगारीचा डॉन म्हणून ओळखला जातो. त्याने मागील दहा वर्षांत अनेक गुन्हेगारांना हाताशी धरून टोळी तयार केली आणि शहरात दहशत पसरवली. खून, दुखापत, जबरी चोरी, दंगल आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा हात आहे. त्याच्या टोळीतील स्वप्नील बागळे, आकाश गवई, अनिकेत सावळे आणि इतर सदस्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी मागील दहा वर्षांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले. त्यातून हे स्पष्ट झाले की, शुभम आणि त्याच्या टोळीने अकोल्यात संघटित गुन्हेगारीचे जाळे विणले आहे. यामुळे पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999’ (मोक्का) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून यासाठी मंजुरीही मिळवली. या कारवाईत भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले. सध्या बहुतांश आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला करत आहेत.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे प्रमुख शंकर शेळके आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. चांडक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘मोक्का’ आणि ‘एमपीडीए’सारख्या कठोर कायद्यांचा वापर केला जाईल, असा इशारा त्यांनी गुन्हेगारांना दिला आहे. हा केवळ एका गॅंगवॉर प्रकरणापुरता मर्यादित नसून, अकोल्यातील गुन्हेगारीच्या मुळाशी हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे. चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलिसांनी गुन्हेगारांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. शहरातील नागरिकांना आता एक नवी आशा निर्माण झाली आहे की, लवकरच अकोला पुन्हा एकदा शांततेचा श्वास घेईल.