प्रशासन

IPS Bachchan Singh : कागद करणार काळे अन् बंद होणार फालतू चाळे

Akola Police : एसपींनी तयार केली ‘पंचवार्षिक’ यादी

Post View : 90

Author

दंगलींचं गाव म्हणून पुन्हा ओळख मिळविलेल्या अकोल्यातील पोलिस प्रशासनाला शीस्त लावण्याचं काम एसपी बच्चन सिंह करीत आहेत. अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बऱ्यापैकी पकड मिळविल्यानंतर आता सिंह यांनी कामचुकारांवर ‘पंजा’ उगारला आहे.

पश्चिम विदर्भातील महत्वाचं गाव असलेलं अकोला एकेकाळी दंगलींमुळं कलंकित झालं. मध्यंतरीच्या काळात अकोल्यानं हा कलंक पुसला. पण पुन्हा एकदा अकोल्यातील कायदा व सुव्यस्थेची पकड सैल झाली. एकापाठोपाठ अकोला जिल्हा दंगलीच्या चक्रव्यूहात अडकला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत दंगलीचा हा घटनाक्रम सुरू होता. त्यानंतर दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. बंदोबस्ताची धावपळ आटोपल्यानंतर बच्चन सिंह यांनी अकोला पोलिस दलात असलेल्या त्रुटींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून आता त्यांनी काही खास याद्या तयार केल्या आहेत.

एकाच ठिकाणी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्यांना आता ते धक्का देणार आहे. कागद काळे करून त्यांचे बदली आदेश सिंह काढणार आहेत. एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले हे अधिकारी, कर्मचारी अर्थार्जनासाठी फालतू चाळे करीत असल्याचं बच्चन सिंह यांच्या लक्षात आलं आहे. जी. श्रीधर अकोल्याचे पोलिस अधीक्षक असताना अनेकांनी माफियांशी संधान साधलं. पोलिस नियंत्रण कक्ष किंवा पोलिस ठाण्यात गुंडांची तक्रार करणाऱ्यांची नावं माफियांना कळायला लागली. कोणी नियंत्रण कक्षात फोन केलाच, तर पोलिसांना ‘डब्बा’ येण्यापूर्वीच गुंडांना फोन यायचा. याच कारणामुळं अकोल्यात मोठी दंगल घडली. या दंगलीच एकाचा जीव गेला. दुर्दैव म्हणजे या दंगलीचा डाग तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यावर लागला.

Maharashtra : दादा, देसाईंवर राज्य सरकारकडून मोठी जबाबदारी

घुगे गेले सिंह आले

संदीप घुगे यांनी पोलिस अधीक्षक असताना अनेक अधिकाऱ्यांचा गाशा गुंडाळला. त्यांनी व्यापक प्रमाणावर बदली सत्र राबविले. मात्र अल्पवधीतच त्यांचीही अकोल्यातून बदली झाली. त्यानंतर बच्चन सिंह हे अकोल्याचे पोलिस अधीक्षक झालेत. अकोल्यात येताच बच्चन सिंह यांना घुगे यांच्या कार्यकाळापासून सुरू झालेल्या दंगलींच्या आव्हानाला तोंड द्यावं लागले. अकोला, अकोट अशा ठिकाणी तणावाच्या घटना घडल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याचं आव्हान सिंह यांच्यापुढं होतं. ते त्यांनी समर्थपणे पेललं. आता सगळं काही स्थिर स्थावर असताना बच्चन सिंह यांनी अचानक सगळ्यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी चिटकलेल्यांना ते हलविणार आहे.

बदलीसत्र राबविण्यापूर्वी बच्चन सिंह यांनी अकोला पोलिस दलात कार्यरत असलेल्या अनेकांची कुंडलीच तयार करून घेतली आहे. त्यासाठी त्यांनी आपले खबरी कामाला लावले होते. केवळ खबरींवर अवलंबून न राहता, सिंह यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मिळालेली माहिती तपासली. त्यानंतर आता ते ‘अॅक्शन मोड’मध्ये दिसणार आहेत. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे पाच जिल्हे अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात येतात. याच पाच जिल्ह्यांमध्ये बदली करून घेण्यात काही अधिकारी पटाईत आहेत. अकोला किंवा आससपासच्या जिल्ह्यात नियुक्ती मिळविण्यासाठी त्यापैकी अनेकांनी ‘सेटिंग’ करून ठेवली आहे. अशा सेटिंगबाजांचं ‘नेटवर्क जाम’ करण्याचं आव्हानही बच्चन सिंह यांना पेलावं लागणार आहे.

Nitin Gadkari : मुलांबद्दल आता व्हा टेन्शन फ्री, गडकरींनी शोधलाय तोडगा

माफिया वरचढ

अकोल्यात वेगवेगळे माफिया वरचढ ठरत आहेत. अकोला जिल्ह्यात घासलेट, इंधन आणि भूमाफियांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय काही गुन्हेगारांना राजकीय पाठबळही आहे. त्यामुळंच अकोल्यातील प्रत्येक जातीय तणावाच्या घटनेत तीच ती नावं पुढं येतात. अधिकारी येतात अन् निघून जातात. पण तणावाची कोणतीही घटना घडली की, उपाशी मरतो तो सामान्य अकोलेकर. मजूर, गरीब. अशांसाठी काही तरी करण्याचं धाडस बच्चन सिंह दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना देवाभाऊंच्या सरकारकडून सकारात्मक साथ मिळणंही गरजेचं आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!