प्रशासन

Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला

IPS Archit Chandak : नव्या पोलीस अधीक्षकांनी वाजवला शिस्तीचा डमरू

Share:

Author

अकोल्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिस्तीचा दणका देत एक धडाकेबाज कारवाई केली आहे.

अकोल्यात नुकतेच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले अर्चित चांडक हे नाव आज महाराष्ट्र पोलीस खात्यात एक प्रेरणास्त्रोत बनले आहे. नागपुरात आपल्या शिस्तप्रिय, तडफदार आणि निर्भीड कारवाईसाठी प्रसिद्ध झालेले चांडक आता अकोल्यात आले आहेत. त्यांच्या आगमनाने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना धडकी भरली आहे, तर जनतेत विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलीस प्रशासनामध्ये शिस्तीचा अभाव आणि जबाबदारीचं विस्मरण होत असलेल्या काळात चांडक यांनी दाखवलेली ही कडक कारवाई म्हणजे कायद्याचा सन्मान राखण्याचा नवा अध्याय ठरत आहे. कायदा व सुव्यवस्थेची शिस्त पुनर्स्थापित करण्यासाठी पोलीस दलातील गैरशिस्तीवर कठोर भूमिका घेत पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी त्यांचा निर्णयात्मक आणि निर्भीड स्वभाव पुन्हा सिद्ध केला आहे. जिल्ह्यात कायद्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

Ravikant Tupkar : एल्गाराच्या एका इशाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वळले

शिवीगाळ करत धमकी

या कार्यसंस्कृतीचा पहिला ठसा उमटवणारी घटना दिनांक 25 मे 2025 रोजी दहिहांडा येथे घडली. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात, सकाळी सुमारे 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रभूदास गडलिंगे हे शासकीय गणवेशात, पण दारूच्या नशेत असताना, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी अरेरावी करताना आणि धमकीवजा भाषेत वाद घालताना दिसले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला ‘तू दवाखान्यात हजर राहत नाहीस, दवाखाना बंद आहे,’ असे म्हणून वाद निर्माण केला. शिवीगाळ केली, आणि तुझी तक्रार करतो, अशी धमकी दिली.

गडलिंगे यांच्या या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा जनतेसमोर मोठ्या प्रमाणात मलीन झाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि पोलीस दलाची विश्वासार्हता डागाळली गेली. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी दिनांक 27 मे 2025 रोजी प्रभूदास गडलिंगे यांचे निलंबनाचे आदेश जारी केले. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis : सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी ओलांडली अज्ञानाची सीमा

गैरवर्तन खपवणार नाही

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शासकीय नोकरी करताना अशी दारूच्या नशेत वर्दीत फिरणे, जनतेशी उद्धट वर्तन करणे, आणि अधिकाऱ्यांना धमकावणे हे पूर्णपणे अशिस्त आणि अनुचित आहे. या निर्णयाद्वारे पोलीस अधीक्षक चांडक यांनी एक स्पष्ट आणि ठाम संदेश दिला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने शासकीय सेवेतील जबाबदारी विसरून गैरवर्तन केल्यास, ती कृती खपवून घेतली जाणार नाही. पोलीस दल ही जनतेच्या विश्वासाची संस्था असून त्याचा गैरवापर सहन केला जाणार नाही.

या कारवाईमुळे अकोल्यातील पोलीस दलात शिस्तीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. चांडक यांच्या या कठोर आणि योग्य निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत असून, अशा प्रामाणिक आणि निर्भीड अधिकाऱ्यांचीच गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस दलात जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आणि वर्दीतील प्रतिष्ठा जपण्यासाठी अर्चित चांडक यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच एक सकारात्मक आणि प्रेरणादायक उदाहरण बनत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!