
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी मंत्रालयातील त्यांच्या नावाची पाटी अजूनही हटवलेली नाही. दोन महिने उलटून गेले तरी त्यांचे कार्यालय रिक्तच ठेवण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याला जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयाबाहेर अजूनही त्यांची नावाची पाटी कायम असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळात त्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध राजीनामा दिला होता, हे ही विसरता कामा नये.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देखील मंत्रालयात त्यांचे कार्यालय रिक्त आहे. त्याच्या दरवाज्यावर अजूनही मंत्री-धनंजय मुंडे, अशी पाटी तशीच झळकत आहे. या गोष्टीमुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
गूढ नाट्य
सामान्यतः मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर संबंधित मंत्र्यांचे नाव तात्काळ पाट्यांवरून हटवले जाते. परंतु, मुंडे यांच्या बाबतीत हे नियम बाजूला ठेवण्यात आले आहेत. मंत्रालयातील अनेक विभागांत जागेअभावी कार्यालयांची चणचण असताना देखील, मुंडे यांचे दालन रिक्त ठेवण्यात येत आहे. हे चित्र पाहून अनेक राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
मुंडेंच्या राजीनाम्याचे निमित्त होते बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. या प्रकरणात आरोपी म्हणून वाल्मिक कराडसह इतर सात जणांना अटक करण्यात आली. कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय मानला जात असल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. मात्र, स्वतः आजारी असल्याने, राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आणि तिथेच वाद अधिक चिघळला.
सतत चर्चेचा विषय
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पवार टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांना भेटून पुरावेही दिले होते. त्यामुळे या प्रकरणात केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, निकटवर्तीयांवर गंभीर आरोप असताना नैतिक जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळेच राजीनामा घेण्यात आला. परंतु, त्यानंतरची कारवाई मात्र अपूर्णच राहिली आहे. ही अपूर्णता मंत्रालयातील पाटीच्या माध्यमातून अधिक ठळकपणे समोर येत आहे. दररोज मंत्रालयात येणारे अधिकारी, कर्मचारी आणि पाहुणे या पाटीकडे पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
एका बाजूला मंत्र्यांची कार्यालये सगळीकडे शोधावी लागत आहेत, तर दुसरीकडे रिक्त दालनावर एका राजीनामा दिलेल्या मंत्र्याचे नाव कायम आहे. यामुळे मंत्रालयात चर्चेला नवे आयाम मिळाले आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे फक्त एक राजकीय पाऊल नसून त्यामागे अनेक अनुत्तरित पैलू आहेत. मंत्रालयातील पाटी न हटवणे ही देखील एक प्रकारची राजकीय ‘स्थित्यंतराची तयारी’ तर नाही ना, अशा चर्चांनी देखील उधाण घेतले आहे. हे नाट्य पुढे कशी दिशा घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.