महाराष्ट्र

Amaravati : श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वातील अहवाल सर्वोत्तम

Shweta Singhal : महसूल प्रशासनात पारदर्शकतेचा नवा मापदंड

Author

राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित केले आहेत. यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचा अहवाल सर्वोत्तम ठरून त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या महसूल विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators – KPI) निश्चित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आले होते. यामध्ये अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सादर केलेला अहवाल सर्वोत्तम ठरला. या कार्यासाठी त्यांचा नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत आयोजित महा-स्ट्राईड कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यशाळेत श्वेता सिंघल यांनी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकरिता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित करणे, या विषयावर विस्तृत अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धती, माहिती व्यवस्थापन प्रणाली, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व कार्यक्षमता यांचा अभ्यास करून सुयोग्य उपाययोजना व शिफारशी मांडल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य शासनाकडून विशेष सन्मान देण्यात आला.

Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?

महत्वपूर्ण जबाबदारी विभागाला

राज्य शासनाने सहाही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विषयवार समित्या स्थापन केल्या होत्या. प्रत्येक समितीला विशिष्ट विषय देण्यात आला होता. त्यापैकी विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकरिता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक निश्चित करणे, ही अत्यंत महत्वाची जबाबदारी अमरावतीच्या समितीकडे देण्यात आली होती.

श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वाखालील समितीने ही जबाबदारी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडली. महसूल विभागाच्या सुधारित कार्यपद्धतीची रूपरेषा ठरवताना जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. या समितीत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अकोल्याचे अजित कुंभार, यवतमाळचे विकास मीना, बुलढाण्याचे डॉ. किरण पाटील आणि वाशिमच्या बुवनेश्वरी एस. हे सदस्य म्हणून सहभागी होते. त्यांनी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून अहवालाला व्यावहारिक आणि कार्यक्षम रूप दिले.

Nana Patole : राजदंडापुढे घोषणा महागात; सभागृहातून दिवसभरासाठी निलंबित

सामूहिक परिश्रमाचे उदाहरण

शासनाच्या या उपक्रमासाठी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांचे मार्गदर्शन व नोंदणी महानिरीक्षक आणि जमाबंदी आयुक्त यांच्यासोबतची चर्चा उपयुक्त ठरली. श्वेता सिंघल यांच्या म्हणण्यानुसार, हे कार्य फक्त त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांचे नव्हते, तर संपूर्ण समितीच्या सामूहिक परिश्रमांचे फलित होते. कमीत कमी वेळेत KPI अहवाल सादर करणे ही खरोखरच प्रशंसनीय बाब ठरली.

अहवालामुळे महसूल विभागातील कार्यप्रणालीला नवे परिमाण मिळाले आहे. यामुळे कामकाजाचे मूल्यांकन पारदर्शक पद्धतीने करता येईल. गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी स्पष्ट दिशा ठरू शकेल. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा तपशीलवार अभ्यास करता येऊन, भविष्यकाळातील प्रशिक्षण व धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे घेता येणार आहेत.

 

कार्यसंस्कृतीत नवे पर्व

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. त्यामुळेच या विभागात कार्यक्षमतेचा कस लागतो. KPI निश्चितीच्या माध्यमातून प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहिताचा विचार अधिक ठळक होतो.

श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विभागाने जे उदाहरण घालून दिले आहे, ते राज्यातील इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून केलेला सत्कार म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर कार्यक्षम व पारदर्शक शासन व्यवस्थेची जाणीवपूर्वक उभारणी करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!