प्रशासन

Amaravati : समर्पित शिक्षणसेवेचा गौरव

Zilla Parishad : प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीचा बहुमान

Author

अमरावती जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या बहुप्रतीक्षित पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शिक्षकांसाठी हा दिवस अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाचा ठरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या दूरदृष्टीने आणि प्रशासनाच्या परिश्रमाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतींचा प्रश्न आज मार्गी लागला. शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

गेल्या वर्षभरापासून अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ सातत्याने पदोन्नतीसाठी पाठपुरावा करत होता. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेत ठोस पावले उचलली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी एक महिना पूर्वी शिक्षक संघाच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले होते की, सर्व प्रकारच्या पदोन्नती लवकरच दिल्या जातील. त्यानुसार आज जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेत शिक्षकांच्या पदोन्नतींची अंमलबजावणी केली आहे.

Prashant Padole : अमेरिकेच्या आयात शुल्काने भारतीय शेतकरी धोक्यात

व्यवस्थेची उन्नती

पदोन्नतीच्या निर्णयाअंतर्गत विविध श्रेणीतील शिक्षकांच्या पदोन्नती करण्यात आल्या. विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी दोन साठी 6 पदे, श्रेणी तीन साठी 4 पदे, केंद्रप्रमुख पदांसाठी 23 जागा, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी साठी 120, उर्दू विभागासाठी 20 पदे आणि माध्यमिक शिक्षक उच्च श्रेणी पदोन्नती यासह अनेक पदांची नियुक्ती आज करण्यात आली. या निर्णयामुळे शिक्षकवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

पदोन्नती प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणाधिकारी प्राथमिक अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे, विस्तार अधिकारी श्री. मोहने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः श्री. मालोकर, काळमेघ, ऋषिकेश कोकाटे, बिलबिले, अधीक्षक प्रवीण जिसकार आणि प्रशासन अधिकारी मुद्रे यांनी उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय साधून शिक्षकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून दिले.

Harshwardhan Sapkal : चुलत्याचा पक्ष चोरला, आता मुस्लिमांचा विश्वासघात

उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल

शिक्षक हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक घटक आहेत. त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन आणि संधी मिळाली तर शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या कामगिरीत अधिक सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणादायी शिक्षण मिळेल. भविष्यात शिक्षण क्षेत्रात आणखी सकारात्मक बदल घडवण्यासाठी असेच निर्णय घेतले जातील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

निर्णयाचे स्वागत करत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे किरण पाटील, गजानन चौधरी, सुभाष सहारे, संजय साखरे आणि अशोक चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, शिक्षण विभाग आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. हा निर्णय शिक्षण क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!