महाराष्ट्र

NCP vs NCP : अनं तू वळून बी माझ्याकडे पाहिना…

Mitkari & Pawar : साहेब-दादांच्या लढाईत मैत्रीचा अंत

Post View : 124

Author

राजकारणात नाती तितकीच नाजूक असतात, जितकी मैत्री घट्ट वाटते, तितक्याच वेगाने ती तुटण्याची शक्यता असते. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची दोस्तीही अशीच होती. एकेकाळी एकत्र लढणारे, एकमेकांची प्रशंसा करणारे हे दोघे आज दोन वेगवेगळ्या वाटांवर उभे आहेत.

‘मागं पळून पळून, वाट माझी लागली, अनं तू वळून बी माझ्याकडे पाहिना…’ फॅन्ड्री चित्रपटातील अजय अतुलचं हे गाणं ऐकलं की मन थेट मराठमोळ्या भावनांच्या गाभाऱ्यात हरवतं. एकेकाळी मराठी पडद्यावर गाजलेले हे गाणं आजही लागले की लोक त्यावर फेर धरतात. मात्र, सध्या हेच शब्द महाराष्ट्राच्या राजकीय पटावर तितकेच सुसंगत वाटत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील दोन आमदार हे या गीताच्या ओळींना सार्थ ठरवत आहेत.

एकदा एक घर होतं, सुखानं नांदणारं… पण आता त्या घरात दोन तलवारी भिडल्यात. असं काहीसं चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतंय. एकेकाळी एकसंध असलेली ही पार्टी आता दोन गटांत विभागली गेली आहे. एक साहेबांचा, तर दुसरा दादांचा. या दोन गटांमधील शाब्दिक युद्ध आणि राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा रंग चढवलाय. या रणसंग्रामात दोन नावं सतत पुढे येतात. रोहित पवार आणि अमोल मिटकरी. साहेबांच्या गटातील रोहित आणि दादांच्या गटातील अमोल हे दोन तरुण आमदार आता जणू एकमेकांचे ‘राजकीय शत्रू’ बनलेत. त्यांच्यातली ही टक्कर इतकी तीव्र झालीये की, त्यांची ओळख आता ‘माइक टायसन’ म्हणून ओळख होऊ लागली.

Abu Azmi : औरंगजेबाचा महिमा गायला; ठरले कारण सभागृहाबाहेर जायला

राजकीय मतभेद

महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजतंय, आणि या सगळ्या धामधुमीत विधिमंडळाच्या प्रांगणात रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे दोन नेते चर्चेचा विषय ठरतायत. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांसमोर दोघंही आपापल्या गटाच्या भूमिका मांडण्यासाठी एकामागोमाग येत असले, तरी त्यांच्यातलं अंतर स्पष्ट दिसतंय. अमोल मिटकरी हे जणू काही रोहित पवार यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. भेटणं, बोलणं, अगदी नजरेलाही टाळतायत. दुसरीकडे, रोहित पवारही अमोल मिटकरींपासून तितक्याच सावध अंतरावर राहताना दिसतायत. एकेकाळी मैत्रीच्या गप्पा मारणारी ही जोडी आता एकमेकांच्या सावलीलाही दूर ठेवण्याच्या पवित्र्यात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना हे दोन आमदार एकत्र गटागटाने फिरायचे, स्तुतीसुमने उधळायचे, एकमेकांच्या बाजूने उभे राहायचे. पण आता काळ बदललाय, आणि गट फुटले की मनंही फुटतात हे यांच्यातून दिसून येतंय. विधिमंडळाच्या प्रांगणातूनच जणू एक मूक नाट्य रंगतंय जिथे शब्दांपेक्षा नजर टाळणं जास्त बोलकं ठरतंय. एकेकाळी एका विचाराने बांधले गेलेले हे नेते आज एकमेकांकडे पाहायलाही तयार नाहीत, आणि या बदललेल्या समीकरणांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण मिळालंय.

Vijay Wadettiwar : न्यायालय शिक्षा सुनावतं, सरकार पाठीशी घालतं

यार बिछड़ गये

वारश्याचं राजकारण महाराष्ट्राच्या रक्तातच भिनलंय असं म्हणायला हरकत नाही. एकेकाळी काका-पुतण्याची जोडी राज्याच्या राजकीय आखाड्यात रंगत आणायची. काकांचा दबदबा, त्यांचा वारसा आणि त्याला पुढे नेणारा पुतण्या, ही कहाणी महाराष्ट्राला नवीन नाही. पण या नात्याला बंडखोरीची झालर लागली की चित्र बदलतं. पुतण्याने काकांविरुद्ध उचललेलं पाऊल संपूर्ण राज्याला हादरवून सोडतं. सत्ता आणि निष्ठा यांच्यातील द्वंद्वामुळे पक्षांतर्गत गोंधळ उडतो, ज्यामुळे कोण कुठे राहील आणि कोण कोणाच्या बाजूने उभा राहील, हे अनिश्चित बनते.

साहेबांच्या गटातील रोहित आणि दादांच्या गटातील अमोल ही नावं कायम चर्चेत राहिली. एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी ही जोडी आपापल्या गटाचं प्रतिनिधित्व करताना दिसते. रोहित साहेबांच्या गटात तर अमोल दादांच्या गटात, दोघंही आपापल्या बाजू सक्षमपणे मांडताना दिसतात. पण जिथे एकदा जीवापाड प्रेम होतं, तिथे आता अंतर वाढलंय. ‘यार बदल गया’ असंच काहीसं चित्र आता दिसतंय. हे युवा नेते, जे कधी एकमेकांचे आधार होते, आज वेगवेगळ्या वाटा चोखाळताना दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही उलथापालथ म्हणजे एक न संपणारी नाट्यमालिकाच आहे, जिथे प्रत्येक पात्र आपलं स्थान शोधत राहतं.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!