ओबीसी नेतृत्वावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खवळलेलं वादळ पाहायला मिळत आहे. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यांना अमोल मिटकरी यांनी सडेतोड आणि मिश्कील शैलीत उत्तर देत राजकीय रंगमंचात खळबळ उडवून दिली आहे.
राजकारणात शब्दांची धार तलवारीपेक्षा तीव्र असते आणि सध्या महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वावरून रंगलेली जुंपल्याची हीच सजीव साक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्या वक्तव्यांना ‘स्वतःची औकात विसरल्याचा प्रकार’ ठरवले आहे. मिटकरी म्हणतात, लक्ष्मण हाके हे अजित पवार यांच्यावर टीका करण्याच्या लायकीचेही नाहीत. आम्हावर हल्ला चढवायचा असेल, तर त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागेल.
पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, लक्ष्मण हाकेंनी कोणत्या अवस्थेत रात्री हे बोलले, हे सांगण्याची गरज नाही. जर स्वतःला मर्द समजत असतील, तर त्यांनी माझ्या शर्टच्या बटनाला हात लावून दाखवावा. त्यांनी वेळ आणि ठिकाण सांगावं, मी तेथे हजर राहीन. यापुढे जात त्यांनी टिंगल करत म्हटलं, “त्यांचा पार्श्वभागावर Y आणि Z पँट घातल्यावरही दिसेल, अशा मंजनाची सोय आम्ही करू.
ओबीसी नेतृत्व
मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, ओबीसी समाजाचे खरे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, हरीभाऊ राठोड. लक्ष्मण हाके हे या यादीत कुठून आले? स्वतःला मोठा नेता म्हणवून घेण्यासाठी भडक विधानं करणं ही काय नेतृत्वाची व्याख्या आहे का?
अजित पवार यांच्यावर ओबीसींसाठी निधी न देण्याचा आरोप केल्याबद्दल मिटकरी यांनी हाके यांना उद्देशून सांगितलं, त्यांनी बहुधा बजेट वाचलेलं नाही. 30 तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे. आम्ही उत्तर देताना हवेत गोष्टी करत नाही. आरोप करायचा असेल तर तारखेवर, आकड्यांवर बोला. कारण आम्ही सिद्ध माहितीवर बोलतो.
हिशेब हाके देणार?
अमोल मिटकरी यांनी पुढे प्रश्न विचारला की, “लक्ष्मण हाके यांना गाडी कुणी दिली, याचा खुलासा त्यांनी करावा. रवीकांत तुपकर यांना शेतकऱ्यांनी आंदोलने केल्यावर प्रेमाने गाडी दिली. पण हाके यांना कोणत्या कामगिरीसाठी गाडी भेट मिळाली? कुठे उमेदवार उभे करायचे, कुठे वंचित बहुजन आघाडीत जायचे, कुठे महायुतीला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला विरोध करायचा, हे त्यांचं राजकारण म्हणजे एक प्रचलित माकडचाळा आहे.
मिटकरी यांनी आपल्या पक्षातील ओबीसी नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितले, आमचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदिती तटकरे हे ओबीसी समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत. आदिवासी समाजासाठी झिरवाळ साहेब कार्यरत आहेत. या सगळ्यांनी समाजासाठी नेहमी भूमिका घेतली आहे. केवळ जातीय भावना भडकवून राजकारण करता येत नाही.
निधीची कमतरता
लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, राज्यात ओबीसी समाजासाठी वस्तीगृहे, शिष्यवृत्ती, महाज्योतीसारख्या योजनांमध्ये अजित पवार नेहमीच हात आखडता घेतात. 20 वर्षे अर्थमंत्री राहूनही त्यांनी सामाजिक न्यायासाठी समर्पक निधी दिलेला नाही. उलट जेव्हा आम्ही मागणी करतो, तेव्हा आमच्यावर वैयक्तिक टीका केली जाते.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप काही नवीन नाहीत. पण ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरून रंगलेली ही लढाई केवळ वैचारिक न राहता व्यक्तिगत पातळीवर पोहोचली आहे. अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील या वादाची पुढची झळ कोणाला लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एक मात्र स्पष्ट की, महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या ‘ओबीसी नेतृत्वाची नवी व्याख्या’ रंगवली जात आहे.