महाराष्ट्र

Amol Mitkari : दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी विठोबाच्या चरणी आमदारचे साकडं

Maharashtra Politics : श्रद्धेच्या रसात उधळले राजकारणाचे रंग

Post View : 1

Author

मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या गोंधळात महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच खळबळ माजलेली असताना, अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा रोखठोक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची कुरघोडी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू असताना, उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीभोवती राजकीय झगडे गडद होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजूनही ‘मुख्यमंत्रीपद गमावलं’ या वेदनेतून स्वतःला सावरलेलं नाही. तोच अजित पवार यांच्याभोवती देखील मुख्यमंत्रीपदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांचं स्फोटक वक्तव्य.

मिटकरी यांनी अगदी भक्तिभावाने पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करत, आषाढी एकादशीला अजित पवार सपत्नीक मुख्यमंत्री म्हणून महापूजा करोत,अशी इच्छा व्यक्त केली आहे. मिटकरींच्या या ‘साकड्याने’ केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे तर राजकीय भूकही अधोरेखित केली आहे. अकोल्यातील आरोग्यनगर येथील अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आगमन झाली होती. संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालेलं असतानाच, मिटकरी यांनी विठ्ठलाच्या चरणी मुख्यमंत्रीपदासाठी साकडं घातलं.

मिटकरी यांनी पत्नीसमवेत त्यांनी पालखीची आरती केली, फुगडी देखील खेळली आणि भक्तिभावाने ’राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे असावं,’ अशी उघड इच्छा व्यक्त केली. ’पांडुरंगाच्या मनात यंदा नसेल, पण पुढच्या आषाढी एकादशीला अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक महापूजा करत असावेत, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे,’ असे मिटकरी म्हणाले. ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या मार्गस्थ होत असताना, मिटकरींच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली आहे.

मित्रपक्षात अस्वस्थता

अमोल मिटकरी यांचा अजित पवारांवरील विश्वास नवा नाही. मागील वर्षीही त्यांनी ठामपणे अजितदादा मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणारा नेता मुख्यमंत्री होणारच, असा त्यांचा सूर होता. महिलांसाठी ई-पिंक रिक्षा, मोफत शिक्षण, विजेचं बिनबील, आणि ‘लाडकी बहिण योजना’ या सगळ्या योजनांचा दाखला देत त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यावेळी त्यांनी अगदी आत्मविश्वासाने सांगितलं होतं की, या योजना निवडणुकीत निर्णायक ठरणार आणि अजित पवारच पुढच्या वर्षी मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील.

Narendra Bhondekar : स्वबळाच्या दाव्यानंतर महायुतीने करून दिली आठवण 

मिटकरींची श्रद्धा केवळ विठ्ठलाच्या चरणीच नव्हे, तर अजित पवारांच्या भवितव्यातही खोलवर रोवलेली आहे. मिटकरींच्या या विधानाने महायुतीच्या गोटात मात्र अस्वस्थतेची लहर पसरली आहे. आधीच मुख्यमंत्रीपदावरून सततच्या चर्चांनी महायुतीतील सामंजस्य डळमळीत झालं आहे. त्यातच राष्ट्रवादीतील एक आमदार जाहीरपणे अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करत असल्याने, याला केवळ धार्मिक साकडं म्हणणं भोळेपणाचं ठरेल.

राज्यातील राजकारण हे एकाचवेळी भक्ती, शक्ती आणि राजकीय युक्तीने चालतं, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील का, याचा निर्णय विठोबा घेईल की मतदार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!