
आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याच्या घटनेवर उपरोधिक पोस्ट करत टोला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सांगलीतील एका विचित्र घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नवा गदारोळ निर्माण केला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वादग्रस्त पोस्टद्वारे भिडेंवर थेट चिमटा घेतला. त्यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडवला आहे.
सांगलीतील माळी गल्ली भागात भिडे यांच्यावर अचानक कुत्र्याने हल्ला केला. त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सांगली महापालिकेने कुत्र्यांच्या धरपकडीला गती दिली आहे. पण या घटनेचा खरा स्फोट राजकीय व्यासपीठावर झाला, जेव्हा आमदार मिटकरी यांनी या घटनेवर उपरोधिक आणि चोख शैलीत भाष्य केलं.

संमिश्र प्रतिक्रिया
अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये, ‘त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? जो कुणी असेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मुगलाई लागलीय का?’ असा उपरोधिक आणि कडवट चिमटा घेतला. त्यांच्या या वाक्यांनी भिडेंच्या समर्थकांमध्ये संतापाचे वादळ निर्माण केले, तर काही नेटकऱ्यांनी या भाष्याची दखल घेतली आहे.
मिटकरी हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखले जातात, आणि या पोस्टने त्यांच्या बिनधास्त शैलीची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे. मात्र यामुळे राजकीय वातावरणात निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र होत आहे.
Vijay Wadettiwar : सद्भावना रॅली म्हणजे सामाजिक ऐक्याचा हुंकार
उफाळलेले राजकीय वादळ
भिडेंवर झालेला हल्ला ही दुर्दैवी घटना असली, तरी त्यावरून सुरू झालेल्या राजकीय टिप्पणीने राज्यातील जातीय आणि धर्मसंबंधित समिकरणांमध्ये नव्या ढगांची भर टाकली आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टद्वारे एक प्रकारे भिडेंच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणावर अधिकृत भूमिका घेतली नसली तरी, मिटकरी यांच्या आक्रमक विधानांमुळे पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट होते. यामुळे आगामी काळात राजकीय चर्चांमध्ये ही पोस्ट एक महत्त्वाची ठिणगी ठरणार आहे. भिडेंवरील टीकेमुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेला बळ मिळालं आहे. भाजप व हिंदुत्ववादी संघटनांना याचे प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.