अमरावतीच्या अचलपूर येथे पोलिसांनी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले आणि गुन्हेगारांना अटक केली.
विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैधरीत्या वाळू उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांचे धाडस वाढले आहेत. प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी वाळूचे साठे आहेत, तेथून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे वाळू तस्करीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
अमरावतीच्या अचलपूर उपविभागातील चांदुरबाजार आणि अचलपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा आणि तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी नाकाबंदी करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण 98 लाख रुपयांच्या तीन टिप्पर आणि मोठ्या प्रमाणावर वाळूचा समावेश आहे.
Sunil Mendhe : हीटस्ट्रोक अन् हायपोथर्मियाला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा मिळणार
मुद्देमाल जप्त
अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीत आसिफ आणि इरशाद यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एक टिप्पर आणि तब्बल 48 टन वाळू जप्त केली आहे. एकूण 32 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत इमरान खान याच्याविरोधात कारवाई करत 31 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये एक टिप्पर आणि आठ ब्रास वाळू समाविष्ट आहे.
सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राजेश धुळे आणि नितेश चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून एक टिप्पर आणि 72 टन वाळू जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण तीन टिप्पर आणि मोठ्या प्रमाणावर वाळू जप्त केली गेली आहे. आरोपींवर भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Satish Idhole : शेतकऱ्याने आता किडनीलाच बनवलं विक्रीसाठीचं पीक
महाराष्ट्र सरकारचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली होती. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वाळूच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांना अडचणी येत होत्या, त्यामुळे सरकारचा हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे.