
अमरावती विमानतळ 16 एप्रिल रोजी प्रवासी विमानसेवा सुरू करत असून, एअर इंडियाच्या पुढाकाराने दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले जात आहे.
अमरावतीकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतेय. विदर्भातील या महत्त्वाच्या शहराचे आकाशाशी नाते जोडण्याचा ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे. अखेर, अमरावती विमानतळ पूर्णतः कार्यान्वित झाला आहे. अवघ्या काही तासांतच येथे प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. 16 एप्रिल रोजी पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण होत आहे. या दिवशी शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. या लोकार्पण समारंभात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे (FTO) प्रात्यक्षिक उड्डाण डेमो फ्लाईट याच दिवशी होणार आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि एअर इंडियाच्या पुढाकारातून हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. ही सुरुवात केवळ प्रवासापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, उद्योग, पर्यटन आणि हवाई संपर्कात नवचैतन्य निर्माण करणारी आहे. अमरावती आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या मार्गावर आहे. बेलोरा येथील या प्रशिक्षण केंद्रात दरवर्षी 180 व्यावसायिक पायलट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 31 सिंगल इंजिन आणि तीन मल्टी इंजिन विमाने असणार आहेत.
आकाशातील नवा अध्याय
एफटीओ ही संस्था केवळ प्रशिक्षणपुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वर्गखोल्या, डिजिटल ऑपरेशन्स सेंटर, देखभाल केंद्र आणि वसतिगृहे अशा सर्व सुविधा देणार आहे. या संस्थेचे बांधकाम वेगाने सुरू आहे. येत्या जुलै महिन्यापासून प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी स्पष्ट केले आहे की, ही संस्था भारतातील वैमानिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून, त्यांच्या आकाशातील उड्डाणाच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत.
एअर इंडियाच्या एव्हिएशन अकॅडमीचे संचालक सुनील भास्करन यांनी सांगितले की, ही संस्था आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला दिशा देईल आणि भारताला विमान वाहतूक क्षेत्रात अग्रगण्य बनवेल. अमरावतीच्या या ऐतिहासिक प्रकल्पाच्या यशामागे माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. 2014 पासून त्यांनी या प्रकल्पासाठी झटत राहून अनेक राजकीय अडथळ्यांना तोंड दिले. अखेर, त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. नवनीत राणा यांनी ‘लोकहित लाइव्ह सोबत बोलताना सांगितले होते की हे फक्त विमानतळ नव्हे, तर अमरावतीच्या भविष्याचे प्रवेशद्वार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील सर्वात मोठी एफटीओ संस्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरेल. ही संधी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाण करण्यासाठी मदत करेल.