
बदलापूर फेक एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत, सरकारची याचिका फेटाळली गेली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बदलापूर प्रकरण एकदा पुन्हा उफाळले आहे. बदलापूर फेक एन्काऊंटर प्रकरणात नवा वळण आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा थेट सवाल उपस्थित केला आहे. भाजपशी संबंधित शाळेतील संस्थाचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना वाचवण्यासाठीच आरोपी अक्षय शिंदेचा बनावट एन्काऊंटर केला गेला का? देशमुख यांच्या या रोखठोक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की, घटना घडल्याच्या दिवसापासून मी सातत्याने हे सांगत होतो की हा एन्काऊंटर बनावट आहे. आता उच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पोलिसांनी स्वतः गुन्हेगाराला ठार मारले. त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या नाहीत. हे स्पष्ट झाले आहे, असे देशमुख म्हणाले. देशमुख यांनी या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्याठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधित लोकांच्या मालकीची होती. या संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच आरोपीचा बनावट एन्काऊंटर घडवून आणण्यात आला काय? असा थेट सवाल देशमुख यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा झटका
बदलापूर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात कथित एन्काऊंटर करण्यात आला होता. मात्र, हा एन्काऊंटर बनावट होता, असे स्पष्ट करणारा अहवाल पुढे आला. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे राज्य सरकारने या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने ही भूमिका फेटाळून लावली. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारची मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. परिणामी, राज्य सरकारला या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे.
झाकण्याचे षडयंत्र
देशमुख यांनी पुढे सांगितले की, अत्याचार झालेल्या शाळेचे संचालक भाजपा समर्थक आहेत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास दुसरीकडे वळवण्यासाठीच अक्षय शिंदेचा जीव घेतला गेला. या प्रकरणात आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी इतकी गंभीर कारवाई स्वतःच्या निर्णयाने का केली? यामागे कोणाचा दबाव होता आरोपीच्या मृत्यूनंतर खऱ्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न का झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता स्वतंत्र चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांचे स्पष्ट मत, न्यायालयाचा कठोर आदेश, आणि सर्वोच्च न्यायालयाचे ठाम उत्तर, हे सर्व मिळून बदलापूर फेक एन्काऊंटर प्रकरणाचा गुंता आता अधिक गहिरा झाला आहे. या प्रकरणात केवळ आरोपी नव्हे, तर पोलिस, राजकारण आणि व्यवस्थेतील बळींची साखळी दिसते आहे.