
महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील अमानवीयता पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पुण्यातील एका धर्मादाय रुग्णालयाने तातडीच्या उपचारांसाठी 10 लाख रुपये आगाऊ भरण्याची अट घातली आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीच्या तातडीच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. थेट मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेवर रुग्णालयाने उपचार केले नाहीत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर दुर्दैवी घटनेवर अनिल देशमुख म्हणाले, ही घटना महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेच्या क्रूर आणि अमानवी चेहऱ्याचे दर्शन घडवणारी आहे. एका गरीब गर्भवती महिलेला फक्त पैशांअभावी उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो, हे आपल्या राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय असूनही गरीब रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करते, हे अत्यंत गंभीर आहे. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अनिल देशमुख पुढे म्हणाले की, या रुग्णालयाला सरकारी अनुदान मिळते, कर सवलती मिळतात. मग असे असताना, हे रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांना प्रवेश नाकारते, हे सरळ सरळ कायद्याचा भंग आहे. हा विषय आम्ही विधानसभेत उचलून धरू आणि सरकारला जबाबदार धरू.

Ashish Deshmukh : महाराष्ट्रात शिक्षणाच्या मॉडेलद्वारे सकारात्मक बदल
आदेशाला केराची टोपली
घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून फोन करूनही रुग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत. अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित करत म्हटले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आदेश दिल्यानंतरही जर एखादे रुग्णालय ऐकत नसेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल, याची कल्पना करणे कठीण नाही. सरकारने या प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा, ही आरोग्य व्यवस्थेतील दडपशाही संपणार नाही.
अनिल देशमुख यांनी पुढे स्पष्ट केले की, धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांवरही श्रीमंत आणि पैसे देऊ शकणाऱ्या रुग्णांनाच प्राधान्य देतात. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून अशा प्रकारचे गैरप्रकार चालू राहिले, तर भविष्यात आणखी असे दुर्दैवी मृत्यू पाहायला मिळतील. म्हणूनच आम्ही सरकारला मागणी करतो की, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी कठोर नियमावली लागू करावी. गरीब रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांचा योग्य वापर होत आहे का, यावर ठोस नियंत्रण असावे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने कुटुंबीयांनी तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांची सिझेरियन प्रसूती झाली आणि त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. पण दीर्घ विलंब आणि शारीरिक त्रास वाढल्यानं तनिषा यांची प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर समाज माध्यमांवरही संतापाची लाट उसळली आहे. अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनंतर आता सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.