महाराष्ट्र

Anil Deshmukh : ईव्हीएमवर जिंकणारा, बॅलेट पेपरवर हरला 

NCP : भाजप नेता पराभूत; दाल में कुछ काला है 

Author

सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभूतपूर्व विजय आणि भाजपचा दारुण पराभव. राज्यात नव्या राजकीय वादळाला सुरुवात झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सहकार मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपच्या गोटात खळबळ उडवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला.

अनिल देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 44 हजार मतांनी विजयी ठरलेला भाजपचा आमदार, बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र निम्मी मते देखील मिळवू शकला नाही. दाल में कुछ तो काला है, असं सूचक आणि तितकंच घणाघाती विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. दोघांच्याही पॅनलला साडेसात ते आठ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ही आकडेवारी पाहता, सह्याद्रीत राष्ट्रवादीचे वर्चस्व अजूनही अभेद्य असल्याचे स्पष्ट होते.

Parinay Fuke : आमदाराची रुग्णांसाठी तात्काळ रुग्णालयात धाव 

मतांचा विसंगती

साखर कारखाना निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, जेव्हा EVM च्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांना दणदणीत मताधिक्य मिळते. त्याच मतदारसंघात बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होतो, तेव्हा सामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो. मग EVM कितपत विश्वासार्ह आहे?

विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या ईव्हीएमबाबत विरोधकांनी पूर्वीपासूनच आक्षेप घेतले होते. मात्र सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर स्पष्टपणे भाजपला धूळ चारली गेल्याने, हा मुद्दा पुन्हा जोरात चर्चेत आला आहे. अनेकांनी सोशल मिडियावर देखील भाजपच्या पराभवावरून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राजकीय भूकंपाची शक्यता

निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधी सूर उठण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत पैशांची उधळपट्टी करूनही भाजपचा जोर लागत नाही. ज्या नेत्याला विधानसभा निवडणुकीत हजारोंच्या मताधिक्याने विजयी ठरवले जाते, तोच इथे अपयशी ठरतो, यावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. सह्याद्री कारखान्यावर बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व कायम राहणे ही केवळ एक निवडणूक जिंकल्याची बाब नाही, तर ही आहे शेतकरी, कामगार, सभासद यांचा त्यांच्यावरील विश्वासाचा कौल. त्यामुळे हे यश ऐतिहासिक मानले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

सह्याद्रीच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आगामी पंचायत, जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकांमध्ये नव्या आत्मविश्वासाने उतरू शकते. भाजपला ग्रामीण भागात कितीही पैसा ओतून सत्ता मिळवता येत नाही, हे या निकालाने अधोरेखित केलं आहे. शेवटी, अनिल देशमुखांचे वक्तव्य केवळ एक राजकीय टोला नसून, EVM च्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारे गंभीर विधान आहे. आता पाहावं लागेल की राज्यातील इतर नेते आणि पक्ष या मुद्द्यावर काय भूमिका घेतात. भविष्यातील निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!