महाराष्ट्र

Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचे कंट्रोल टॉवर अनिल देशमुखांकडे

Anil Deshmukh : नागपूर रणांगणात रणनीतीची नवी दिशा

Author

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तयारीला वेग दिला आहे. पक्षाने महत्त्वाची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवून रणनितीचे सूत्र त्यांच्या हाती दिले आहे.

नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरु झाली आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने देखील आता आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पक्षाचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत निवडणुकीचे सर्व अधिकार देशमुख यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला. तो सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक वेगळी आणि निर्णायक मानली जात आहे, कारण पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. सध्या या पक्षाचा नागपूर महापालिकेत एकच नगरसेवक आहेत. शहरात पुन्हा आपला जम बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने प्रयत्न करत आहे. बैठकीत देशमुख यांच्यासोबत माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, किशोर गजभिये, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, निरीक्षक मुनाज शेख यांच्यासह शहर आणि प्रदेश स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Akola MSEDCL : कारवाईला घाबरले अन् बदलीसाठी पळाले

समस्यांची दखल

या बैठकीत नागपूर शहरातील भाजपच्या 15 वर्षांच्या कारभाराचा तीव्र समाचार घेत अनिल देशमुख यांनी ठासून सांगितले की, भाजपने जाहिर केलेल्या अनेक योजना केवळ कागदोपत्रीच यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र नागपूरकरांना त्याचा लाभ झालेला नाही. त्यांनी नमूद केले की, OBCW प्रकल्पांतर्गत शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती, परंतु आजही अनेक भागांमध्ये नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. काही भागात तर केवळ दोन ते तीन तासच पाणी मिळते, तर कुठे अत्यल्प दाबाने पाणी येते. यासोबतच पाणीपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, ज्याचा थेट भार सामान्य नागरिकांवर पडला आहे.

शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कचरा उचलण्याचे काम एका खाजगी कंपनीकडे दिले असले, तरी अनेक भागांत अजूनही कचर्‍याचे साम्राज्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भांडेवाडी डंपिंग यार्डचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. देशमुख यांनी शहरातील रस्त्यांच्या अपूर्ण कामांवरही लक्ष वेधले. पावसाळ्यात सीताबर्डीसारख्या मध्यवर्ती भागात पाणी साचते. अनेक भागांत पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सर्व प्रश्न समोर ठेवून पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जावे आणि नागरिकांशी थेट संपर्क साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला. यासाठी एक वेळापत्रक तयार करून त्या अनुषंगाने प्रचार मोहिम राबवावी, असेही ते म्हणाले.

Maoists : माओवाद्यांच्या अंत्यसंस्कारातून न्यायव्यवस्थेची अग्निपरीक्षा

गजभिये यांना महत्त्वाची जबाबदारी

या बैठकीत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची पक्षाच्या नागपूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रशासनातील अनुभवाचा लाभ पक्ष संघटनेस होईल, या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक निर्णायक ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरमध्ये नव्याने मोर्चेबांधणी करताना जुने कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निवडणुकीत पक्षाची ताकद कसोटीला लागणार असली तरी देशमुखांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नव्या ऊर्जा आणि स्पष्ट दिशा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!