महाराष्ट्र

Gondia : फसव्या आयडींनी गाठली शिक्षणसंस्थेची गाभा

Shalarth ID Scam : शालार्थ घोटाळ्याच्या दलदलीत अजून एक मुख्याध्यापक अडकला

Author

शाळेच्या पटावर असलेली नावे खोटी, शिक्षकांची ओळख बनावट आणि शिक्षणाच्या नावाखाली उभा राहिलेला आणखी एक भस्मासुर. महाराष्ट्रातील गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता गोंदियातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक होऊन खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. शाळेच्या पटावर असलेली नावे, वर्गखोल्यांमध्ये न दिसणारे शिक्षक आणि कागदोपत्री फुगवलेल्या आकड्यांची ही मायाजाल आता आणखी खोलवर रुजत चालले आहे. शिक्षणाचा मंदिर समजल्या जाणाऱ्या संस्थांमध्येच फसवणुकीचे सावट गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातून धनराज हुकरे या मुख्याध्यापकाला विशेष तपास पथकाने (SIT) बुधवारी रात्री अटक केली. हुकरे हे गोंदियातील मरदोली गावातील रहिवासी असून, ते देवरी येथील शिवराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. विशेष म्हणजे, हेच धनराज हुकरे भीमाबाई शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, जी संस्था तब्बल 2 महाविद्यालये आणि 10 शाळा चालवते. शैक्षणिक व्यवस्थेच्या हृदयातच अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे विष पेरले जात असल्याचे हे एक गंभीर उदाहरण ठरत आहे.

Vijay Wadettiwar : ‘छप्पन इंच का सीना’ आता झाला सव्वीस इंचांचाच 

खोट्या आयडीद्वारे सेवेत

विशेष तपास पथकाच्या तपासणीत उघड झाले आहे की, धनराज हुकरे यांनी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करत बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन शिक्षकांची नियुक्ती केली होती. हे दोन्ही शिक्षक फसव्या शालार्थ आयडीद्वारे शाळेत सेवेत असल्याचा दावा कागदोपत्री केला जात होता, प्रत्यक्षात मात्र शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवत लाखो रुपयांचा अपहार केला जात होता.

ही धाडसी कारवाई नागपूर पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरडाले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अटकेनंतर धनराज हुकरे यांना नागपूरला आणण्यात आले आणि न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 26 जुलै (शनिवार) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

पदाधिकारी, अधिकारीही अडकले

अटकेनंतर शालार्थ घोटाळ्यात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. पोलिसांच्या मते, हा घोटाळा केवळ नियुक्त्यांपुरता सीमित नाही. या जाळ्यात अनेक खाजगी संस्थांचे पदाधिकारी आणि सरकारी अधिकारीही अडकले असल्याची शक्यता आहे. तपास अधिक खोलवर चालू असून, पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

या सगळ्या प्रकारातून शिक्षण क्षेत्रात घडणाऱ्या भीषण घोटाळ्यांची भीषणता अधोरेखित होते. विद्यार्थ्यांचे भविष्य खेळण्याचा अधिकार कुणालाच नाही, आणि अशा फसवणुकीत सहभागी असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, ही जनतेची अपेक्षा आहे. शालार्थ आयडी घोटाळा केवळ आर्थिक अपहार नाही, तर तो शिक्षणव्यवस्थेच्या आत्म्यावर घालण्यात आलेला घाव आहे आणि या जखमेवर फक्त कायद्याचा कठोर उपचारच उपयुक्त ठरू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!