
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार फॉरेन टूरवर आहेत. त्यांच्या आई आशाताई पवार मात्र विठुरायाच्या दरबारात पोहोचल्या.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक नेते, उद्योगपती, बॉलीवूड स्टार फॉरेन टूरवर गेले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. अजित पवार हे नववर्षानिमित्त सध्या परदेशात फिरायला गेले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये ते राज्यात परतणार आहेत. यानंतर ते पुन्हा सक्रिय होतील. मात्र त्यापूर्वी त्यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी पवार कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आशाताई पवार यांनी देवाच्या समोरील दानपेटीत आपल्या सोबत आणलेले गुप्त दान अर्पण केले. त्यांनी सोबत आणलेले 500 रुपयांच्या नोटांचे बंडल जाड होते. त्यामुळे हे बंडल मंदिरातील दानपेटीमध्ये जात नव्हते. त्यामुळे या नोटांची विभागणी करून आशाताई यांनी दोनदा रक्कम दानपेटीमध्ये टाकली. त्यानंतर त्यांनी देवाच्या चरणी प्रार्थना केली. विठ्ठल मंदिरामध्ये संत्र्याची आरास करण्यात आली होती. त्यानंतर विठ्ठल मूर्तीला सजविण्यातही आले होते.

NCP वर संकट
सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते वेगवेगळ्या संकटाचा सामना करीत आहेत. मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडी अजित पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ‘हॉलिडे टूर’वर आहेत.
राजकारणातील या सगळ्या धावपळीपासून अजित दादा यांना काहीशी विश्रांती हवी होती असे यावरून दिसत आहे. विदेशातून परतल्यानंतर अजित पवार हे नव्या दमाने चक्रीय होतील असे सांगण्यात येत आहे. नागपूर येथे युवाई अधिवेशन सुरू असतानाही अजित पवार हे काही दिवस गायब होते. छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सुरू असताना अजित पवार हे नागपुरात नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ते नागपुरातच होते असे ठामपणे सांगण्यात येत होते. काही दिवस गायब राहिल्यानंतर अजित पवार हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिसले. आता पुन्हा एकदा ते सुट्टीवर गेले आहेत.
राज्यातील अनेक नेतेही सध्या ‘हॉलिडे मूड’मध्ये आहेत. त्यातील बऱ्याच नेत्यांनी वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये जात नवीन वर्षानिमित्त देवदर्शन घेतले. काही नेते फिरण्यासाठी प्रदेशात गेले आहेत. त्यामुळे ख्रिसमस पासून राज्यातील राजकीय घडामोडी काहीशा संथावल्या आहेत. नवीन वर्षामध्ये नव्या जोमासह महायुती सरकार दमदारपणे कामाला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.