महाराष्ट्र

नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी Ashish Deshmukh सरसावले

कर्करोग उपचारांसाठी आमदाराने घेतला पुढाकार 

Author

सावनेर मतदारसंघात कर्करोग रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळावे यासाठी आशिष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.

सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांचे गंभीर आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी कर्करोग उपचार व तपासणी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नुकतीच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आशिष देशमुख यांनी सावनेर आणि परिसरातील नागरिकांसाठी नियमित कर्करोग तपासणी व सर्वेक्षण मोहीम हाती घेण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी मिळत नाही, त्यामुळे अनेकदा कर्करोगासारखे गंभीर आजार शेवटच्या टप्प्यावर असताना आढळतात. हे टाळण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम स्तरावर प्रभावी आरोग्य चाचण्या व मोफत तपासणी केंद्रे सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

एकनिष्ठ राहिले नानांचे ‘छावा’, महायुतीला पाणी पाजलेच भावा

उपचार केंद्रांची गरज

आमदार डॉ. देशमुख यांनी मतदारसंघात कर्करोग निदान केंद्र सुरू करण्याचीही मागणी केली. आजच्या घडीला ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोग निदानासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो, तसेच अनेक गरीब कुटुंबे आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्तरावरच अत्याधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गंभीर कर्करोग रुग्णांसाठी मोफत उपचार आणि औषधोपचार योजना सुरू करावी, तसेच कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या बैठकीत आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न विद्यार्थी, तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी नवीन वसतिगृहाच्या उभारणीचा मुद्दा रेटला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवल्यास ते अधिक सक्षमपणे रुग्णसेवा देऊ शकतील.

सतत प्रयत्नशील

आमदार आशिष देशमुख यांनी सावनेर येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी देखील केली आहे. मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ते सातत्याने विविध स्तरांवर पाठपुरावा करत आहेत.

कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी सरकारी पातळीवर अधिक सुविधा आणि निधी उपलब्ध करून दिल्यास गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळेल. आमदार आशिष देशमुख यांच्या या प्रयत्नांमुळे सावनेर-कळमेश्वर मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!