गाडी चालवत न्यायाच्या शोधात निघालेल्या कंत्राटी वाहनचालकांना अखेर हक्काचं थांबं मिळालंय. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत पगारातील अन्यायावर पडदा टाकण्यात आला आहे.
एकेकाळी गाड्या चालवत काटेकोर वेळेचे पालन करणारे तेच वाहनचालक. स्वतःचा मोबदला मात्र नेहमीच विलंबाने, कमी प्रमाणात आणि असमानतेने मिळवणारे. पण आता, त्यांच्या आवाजाला प्रतिध्वनी लाभला आहे. कारण राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी एक लढा यशस्वीपणे लढून या गाडीतील ‘ड्रायव्हर सीट’वर न्यायालाच बसवलं आहे.
राज्याच्या कृषी विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांच्या पगारातील असमानतेचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार पगारात चढ-उतार होते. कुठे 10 हजार तर कुठे 15 हजार. एकच काम, एकच जबाबदारी, पण मोबदल्यात विषमता.
हीच वेदना गाड्यांमधून झेलत झेलत आलेले अनेक चालक आता हसऱ्या चेहऱ्याने ‘थँक यू सर’ म्हणताना दिसले. ते म्हणजे अमरावती, हिंगोली, जालना, अहिल्यानगर आदी भागांतून आलेले अतुल गुल्हाणे, हेमंत भोंबे, सचिन चवरे, दिलीप बाभूळकर, खुशाल कोंढे, गजानन खिल्लारे, माणिक अवचर, काकासाहेब दिवे. हे सारे वाहनचालक, ज्यांनी स्वतः भेट घेऊन जयस्वाल यांचे आभार मानले.
Yasomati Thakur : शिक्षणाच्या मंदिरात कालवले धर्माचे विषारी राजकारण
सातत्यपूर्ण धडपड
जयस्वाल यांनी याबाबत माहिती दिली की, या अन्यायकारक परिस्थितीची योग्य दखल घेऊन संबंधित स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ही समस्या मार्गी लागली, हे सांगताना समाधान वाटतंय, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रयत्नांत नुसती तक्रार नव्हे तर सततचा संवाद, अधिकारी वर्गाशी समन्वय, विभागीय बैठका आणि स्पष्ट भूमिका मांडण्याची सातत्यपूर्ण धडपड होती.
तत्कालीन स्थितीत पगाराच्या असमानतेचा प्रश्न इतका गुंतागुंतीचा होता की, अनेक वेळा तो ‘कोणी तरी एक चूक केलीय, पण ती कोण, कशी आणि केव्हा?’ या चक्रात अडकत गेला होता. मात्र, जयस्वाल यांनी त्याला एक स्पष्ट दिशा दिली आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही योग्य निर्णय घेतला जाईल याची हमी दिली.
आज या निर्णयामुळे सर्व जिल्ह्यांतील कंत्राटी वाहनचालकांना समान वेतन मिळेल, हे निश्चित झालंय. त्यामुळे कृषी विभागातील हे ‘अनाम’ पण अत्यंत महत्त्वाचे घटक आता आत्मसन्मानाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतील. या संपूर्ण लढ्याची गवाही म्हणजे, ज्यांचं काम आहे इतरांना वेळेत पोचवणं… त्यांच्याच आयुष्यात वेळेनं केलेली दगाफटका आता थांबतोय. यातून एक महत्वाचा संदेशही मिळतो. जो आवाज दबतो, तो कायमचा नाही मरत… योग्य वेळ, योग्य नेता आणि योग्य पाठपुरावा असेल, तर तो आवाजही निर्णयात रूपांतरित होतो.