
मार्कंडा हे प्राचीन मंदिर असून सध्या त्याचा जीर्णोद्धार आणि विकास सुरू आहे. या कामासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले मार्कंडा मंदिर आता नव्या रूपात उभे राहण्याच्या वाटेवर आहे. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मार्कंडा मंदिरात नुकतीच भेट दिली. मंदिरात सुरू असलेल्या नूतनीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

मार्कंडा मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, मंदिराचा जीर्णोद्धार वेगाने पूर्ण व्हावा. मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक गोष्टींना दूर करण्यासाठी त्यांनी MSIDC आणि स्थानिक प्रशासनासह एकत्रित बैठक घेतली आहे. तसेच कामाला आवश्यक गती देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
Parinay Fuke : कमळाचं कनेक्शन पुन्हा जमलं; काँग्रेसचे दोन धुरंधर वळले
पुरातत्व विभागास निर्देश
जयस्वाल यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व श्रद्धाळूंशी थेट संवाद साधला. भाविकांनी नूतनीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यमंत्री जयस्वाल यांनी त्यांच्या भावना गांभीर्याने घेत विकासकामांमध्ये कोणताही विलंब न होण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. मंदिराच्या चारही बाजूंनी सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 9 कोटी रुपयांच्या कामांची लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामात रस्ते, लाईटिंग, पाण्याची सोय, बसण्यासाठी निवास व्यवस्था यांचा समावेश आहे.
मार्कंडा मंदिर ASI म्हणजेच पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असल्याने कोणतीही कामे करताना नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक असते. यामुळे कामाला वेळ लागतो. मात्र जयस्वाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन ASI अधिकाऱ्यांना गडचिरोलीत बोलावले. त्यांनी कामाचा आढावा घेऊन जे काही अडथळे आहेत त्यावर उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन दिले. त्याचबरोबर पुरातत्व विभागात काम करणाऱ्या कर्मचार्यांची संख्या वाढवून जीर्णोद्धाराचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे सध्या सुरू असलेले काम अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शासनस्तरावर वेळोवेळी निरीक्षण
जयस्वाल यांनी हे काम केवळ एकदाच पाहण्यासाठी न येता वेळोवेळी याचे निरीक्षण करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असे ठामपणे सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यानंतर त्यांनी गडचिरोलीसाठी विशेष योजना आखल्या आहेत. मार्कंडा मंदिराचे रूपांतर एक ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून घडविण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभाग, MSIDC आणि महसूल व बांधकाम विभाग एकत्रितपणे कार्यरत झाले आहे. हे काम एका आदर्श विकास मॉडेलमध्ये परिवर्तित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मार्कंडा मंदिराच्या भेटीवेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपविभागीय अधिकारी रणजित यादव, पुरातत्व विभागाचे शुभम कोरे, MSRDC मधिल एस. जाधव, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासह महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीद्वारे विकासाचा एक स्पष्ट रोडमॅपही तयार करण्यात आला आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मार्कंडा मंदिराच्या इतिहासाला आणि श्रद्धेला साजेशी नवसंजीवनी मिळण्याची सुरुवात झाली आहे. हे कार्य गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीचा एक नवा अध्याय ठरणार आहे.