गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवले आहे. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या पुढाकाराने या समस्येला गांभीर्याने हाताळले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सध्या गंभीर संकटात सापडले असून, त्यांच्या भविष्यासमोर मोठे आरोग्यधोके उभे राहिले आहेत. राज्य विधानसभेत आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील 769 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 304 विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान झाले आहे. ही आकडेवारी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या चिंतेचा विषय ठरली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर मंडळाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असल्याने अशोक उईके यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे. वाढत्या तंबाखू सेवनाच्या विळख्यात विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळेच त्यांच्यात मुखकर्करोगाच्या पूर्वस्थितीचे लक्षणे आढळून आली आहेत. या विद्यार्थ्यांवर शासकीय पातळीवर उपचार करण्यात आले असून काहींवर लेझर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
चिंताजनक स्थिती
सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीत गडचिरोली, भामरागड आणि अहेरी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची व्यापक तपासणी करण्यात आली. ही तपासणी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, इंडियन डेंटल असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीसह आवश्यक त्या उपचारांची तत्काळ सुविधा देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली प्रकल्पातील सात विद्यार्थ्यांवर नागपूर येथे अत्याधुनिक सीओ 2 लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
विशेषत: भामरागड प्रकल्पातील स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे उईके यांनी नमूद केले आहे. या प्रकल्पातील एकूण 1778 विद्यार्थ्यांपैकी 487 विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनाचे ओझे वाहावे लागत आहे. तरीही तात्पुरत्या तपासणीअंती गंभीर आजार निदर्शनास आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु पूर्व मुखकर्करोगाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार करून त्यांचे आरोग्य सावरण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
अहेरी प्रकल्पातील सुधारणा
अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांमध्येही व्यसनाधीनतेची समस्या दिसून आली आहे. येथील 2163 विद्यार्थ्यांपैकी 189 विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातल्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व मुखकर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशोक उईके यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासन अत्यंत गंभीर असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. वाढत्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागृती वाढविण्यासाठी शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती शिबिरे आणि सल्लागार सत्रांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
तोंडाच्या कर्करोगापूर्व स्थितीत सापडलेल्या विद्यार्थ्यांवर त्वरित उपचार करून त्यांचे आरोग्य पूर्ववत करण्याचे प्रयत्न शासन करत असून अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास विभाग या लढाईला अधिक बळ देत आहे. गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अधिक सक्षम आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने शासनाकडून सातत्यपूर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत.