भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहे. पक्षातील अंतर्गत ताकदीची परीक्षाही यावेळी चांगलीच रंगली. माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांना बायपास करून भाजप कोणताही निर्णय घेत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकास कामे करणारे आणि कार्यकर्त्यांची बळकट फळी निर्माण करणारे परिणय फुके हेच पुन्हा एकदा वरचढ ठरले आहेत.
भाजपने भंडारा गोंदिया जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. त्यासाठी भंडाऱ्यात आशु गोंडाणे यांची जिल्हाध्यक्षपदासाठी निवड झाली, तर गोंदियात सीता रहांगडाले यांची जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात आली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी वेगळा रस्ता धरण्याचा प्रयत्न केला. जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांनी प्रचंड जोर लावला. परंतु परिणय फुके नावाच्या सुसाट गाडीला ओव्हरटेक करणे सुनील मुंडे यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मेंढे यांच्या पदरी निराशा पडली.
भाजपचा एल्गार
राज्यातील मागील अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पक्षांतर्गत बदल सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठी फील्डिंग लावली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकारीणीमध्ये बदल सुरू आहेत.
भाजप या निवडणुकीसाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना एकत्र करून, अधिकाधिक प्रभावीपणे आपली उपस्थिती दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भाजपने स्थानिक नेतृत्व मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत.
जोरदार तयारी
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आपली रणनीती ठरवली आहे. या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची तयारी आणखी वेगळी आणि प्रभावी करण्यासाठी पक्षाने आपली कार्यकारिणी पुन्हा सक्रिय केली आहे. या जिल्ह्यांमध्ये आगामी निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते कटिबद्ध झाले आहेत.
जिल्ह्यातून सुरू असलेल्या या राजकीय हालचाली भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्षांची नवीन निवड, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि आगामी निवडणुकीसाठी असलेली तयारी या सर्वांचा परिणाम आगामी निवडणुकीत राज्यभर दिसून येईल.