महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : सौरपंपांचं ऊर्जा शस्त्र, शेतीच्या भविष्याचं रण

Farmers : अपंगत्वावर उपचार नव्हे, सरकारचा सह्यतेचा स्पर्श

Author

अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जीवनात नवे उजाळे फुलवणाऱ्या योजनांचा आरंभ करत शासनाने संवेदनशीलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. सौरऊर्जा, पांदण रस्ते आणि “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून विकासाला आता ममतेचा स्पर्श लाभला आहे.

राज्य सरकार अपंग, ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. 12 तास अखंड वीज देणारे सौरपंप, किमान 12 फूट रुंदीचे पांदण रस्ते, तसेच गरजूंना सहाय्यक उपकरणांचा पुरवठा हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वडाळी येथील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात ‘अलीम्को’ संस्थेच्या माध्यमातून आयोजित सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर, प्रवीण तायडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शिस्तीच्या रडारखाली पीएस-ओएसडी

हजारो अपंगांची नोंद

बावनकुळे म्हणाले, सरकार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी योजना राबवत आहे. विशेषतः अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना प्रभावीपणे कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात तब्बल तीन हजार अपंगांची नोंद झाली आहे. त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार सहाय्यक उपकरणे मोफत वितरित केली जाणार आहेत.

या योजनेची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी गावागावांमध्ये माहिती देण्याच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात अधिकाधिक पात्र नागरिकांना समाविष्ट करून त्यांना या सुविधांचा लाभ मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतीसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज जाता यावे यासाठी कमीत कमी 12 फूट रुंदीच्या पांदण रस्त्यांचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व रॉयल्टी माफ करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Buldhana : जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

एक पेड माँ के नाम

जलसंधारणाच्या दृष्टीने प्रभावी पावले उचलली जात असून, भुजल पातळी वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळा ‘आदर्श शाळा’ बनवण्याचा संकल्प देखील शासनाने केला आहे. येत्या 5 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत ‘एक पेड माँ के नाम’ हा विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावावे, असे भावनिक आवाहनही पालकमंत्री बावनकुळे यांनी उपस्थितांना केले. या उपक्रमासाठी सरकारकडून मोफत रोपे पुरवली जाणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत भाग घेऊन पर्यावरण रक्षणात आपला मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले.

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता, समाजातील गरजूंना कृतीतून मदत करण्याचा संकल्प म्हणून साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, श्रवणयंत्र यांसारख्या सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून उचललेली प्रेरणादायी जबाबदारी आहे.

शेवटी, बावनकुळे यांनी सांगितले की, “या उपक्रमांच्या माध्यमातून फक्त विकास नव्हे, तर आपुलकी, संवेदना आणि सामाजिक उत्तरदायित्व यांना नवसंजीवनी मिळत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ हा फक्त वृक्षारोपण नव्हे, तर आईच्या माया-जडणघडणीतून निसर्गप्रेम निर्माण करण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!