ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासाची काही पानं वाचत काँग्रेसवर आरोप केले. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर गद्दारीचा ठपका लावत संसदेत मुद्दा मांडला.
खोटं जेव्हा सत्यावर दडपायचा प्रयत्न करतं, तेव्हा इतिहास स्वतःला पुन्हा बोलकं करतो, अशा शब्दांत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर संसदेतून थेट आणि धारदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेदरम्यान शाह यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना लोंढे यांनी भाजपा सरकारच्या गुप्त आणि विसरलेल्या पापांची उजळणी करत भाजपवर ‘खोटारडेपणाची सत्तेवरची उंची’ अशी उपमा दिली.
अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील अतिरेकी हल्ल्यांचा उल्लेख करत खोटं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या वाजपेयी सरकारच्या काळात संसद हल्ला झाला, अक्षरधाम मंदिरावर अतिरेकी हल्ला झाला. कंदहार अपहरण प्रकरणात तर थेट केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांनी पाच कुख्यात अतिरेक्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानात पोहचवले होते. हे सत्य अमित शाह विसरले की मुद्दाम दडपले?” असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.
Yashomati Thakur : लाडकीच्या साखरपाणीत मिसळले घोटाळ्याचे विष
बोचरा सवाल
लोंढे यांनी पुढे बोलताना भाजप सरकारच्या ‘देशभक्ती’च्या मुखवट्याखालील वास्तव उघड केले. अफजल गुरु आणि अजमल कसाब यांना काँग्रेस सरकारने फाशी दिली आणि तुरुंगातच दफन केले. मात्र, भाजप सरकारने 1993 वर्षाच्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना परत दिला. हे कोणते देशप्रेम? असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अतुल लोंढे यांनी असेही स्पष्ट केले की, भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा ते हुर्रियत काँन्फरन्सवर ताशेरे ओढायचे. पण खरी गोष्ट अशी आहे की हुर्रियतसोबत सर्वाधिक चर्चा वाजपेयी सरकारच्या काळातच झाली होती. तरीसुद्धा आज शाह काँग्रेसवर देशविरोधी गटांशी जवळीक साधल्याचा खोटा आरोप करत आहेत, हे धक्कादायक आहे, असं ते म्हणाले.
Nagpur : सरकारी फाइल्ससोबत बारमध्ये मद्यपान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबनाचा फटका
हिंमत दाखवत नाहीत
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रकरणात पाकिस्तान हे फक्त पुढील चेहरा होता, खरा सूत्रधार चीन होता, हे खुद्द लष्कराच्या उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी आपल्या भाषणात चीनच्या भूमिकेचा एक शब्दही उच्चारला नाही. चीनचा उल्लेख करण्याची हिंमत गृहमंत्री दाखवत नाहीत, मग अशा सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? असा ठाम सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.
तसेच, शाह यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेविषयीही खोटी माहिती दिल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले. “UNची स्थापना 1945 मध्ये झाली आणि भारत तेव्हा स्वतंत्रही नव्हता. पण शाह हे सांगतात की भारत त्या काळी सदस्य नव्हता, म्हणजे ते खोटं पसरवतात. ही तर थेट इतिहासाची चिरफाड आहे, असं ते म्हणाले.
देशप्रेमाचा निकष
कोंग्रेसने भाजप नेत्यांच्या पाकिस्तानविषयीच्या ‘सॉफ्ट कॉर्नर’वरही बोट ठेवलं. डॉ. मनमोहन सिंह हे पाकिस्तानात जन्मले, पण पंतप्रधान म्हणून त्यांनी तिथे एकदाही पाय ठेवला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतंही औपचारिक निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्याकडे पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या घरी बिर्याणीवर पाहुणचार घेतला. एवढंच नाही तर शपथविधीला नवाज शरीफ यांना खास आमंत्रण देण्यात आलं. हाच का भाजपचा देशप्रेमाचा निकष? असा उपरोधिक सवाल लोंढे यांनी विचारला.
या साऱ्या आरोपांतून लोंढे यांनी हे ठासून सांगितलं की, देशभक्ती फक्त घोषणांनी सिद्ध होत नाही, ती कृतीतूनच दिसते. काँग्रेसवर आरोप करताना भाजपने आपल्या काळातील अतिरेकी घटनांपासून ते पाकिस्तान व चीनसारख्या प्रश्नांवर झाकलेली गुप्त फाईल्स आता पुन्हा जनतेसमोर येऊ लागली आहेत.