प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी संघटनांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या सुरांनी राजकारण गाजायला सुरुवात झाली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता फक्त राजकीय चर्चेपुरता मर्यादित नसून लाखो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. मागील तीन अधिवेशनांतही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस निर्णय न घेण्यात आल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एकदा पुनः सक्रिय भूमिका घेत आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या संघर्षात एका संघटनेचा किंवा जाती-धर्माचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याचा आग्रह बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू यांच्या मते, कर्जमाफी हा विषय राज्यभरातील शेतकऱ्यांच्या जीवन-प्राणाचा विषय असून यासाठी संघटना आणि पक्ष आपापसातील मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रम आखून एकत्र येणे गरजेचे आहे. शेतकरी चळवळ संपली नाही पाहिजे. नाहीतर या लोकांची कोण काळजी करणार? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात आयोजित शेतकरी हक्क परिषदेतील विशेष प्रसंगी बच्चू कडूंनी सर्व शेतकरी संघटनांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. बच्चू कडू म्हणाले, धर्म आणि जातीवर लोक सहसा संघटित राहतात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही वेगवेगळ्या गटांत विभागलेलो आहोत.
Sharad Pawar : दोन चेहरे, 160 जागा अन् माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा
ताकद दाखवण्याचा आग्रह
आपलं वाटोळ झालं आहे. जातपात विसरून एकसंध होऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येण्याची वेळ आली आहे. जर आपण एकत्र आलो तर आपल्याला बजेटमध्ये 50 टक्के वाटा मिळू शकेल. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना जातधर्माच्या जाळ्यात बांधले आहे. पण आता त्यातून मुक्त होऊन आपल्या हक्कांसाठी सरकारच्या विरोधात बंड पुकारावा लागेल.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ही एकता कायम ठेवण्यासाठी आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेणार नाही, एवढा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही त्यांनी परिषदेतील उपस्थितांना सांगितले. शेतकरी हक्क परिषद ही फक्त एक सभा नाही, तर एक आंदोलनाचा नवा टप्पा आहे. ज्यात सर्व शेतकरी संघटनांनी मिळून आपले मत ऐकवण्याचा निर्धार दर्शविला आहे. बच्चू कडू यांचा आग्रह की, आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने जातपात विसरून एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी, जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न उकलू शकेल. शेतकरी संघर्षाची ही नवीन दिशा महाराष्ट्रातील राजकारणातही मोठा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.