
राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवणारी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. पवार कुटुंबातील गुप्त युतीचे धक्कादायक पुरावे त्यांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केलाय.
राजकीय वर्तुळात हलकल्लोळ उडवत, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील एकत्रिकरणावर भाष्य करताना त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार आधीपासूनच एकत्र असल्याचा दावा केला आहे. जशी चाणक्य नीती आहे, तशीच पवार नीती आहे, अशा शब्दांत त्यांनी या दोन्ही नेत्यांमधील गूढ संबंध असल्याचे सांगितले.
नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी झालेल्या रक्तदान आंदोलनानंतर बच्चू कडू माध्यमांशी संवाद साधत होते. या आंदोलनाची जागा खास निवडलेली होती, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घराच्या अगदी काही मीटर अंतरावरचा ट्राफिक पार्क. त्यामुळे हा निषेध अधिक ठळकपणे समोर आला.

पूर्वनियोजित एकत्रिकरणाचा आरोप
राज्यभरात शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच बच्चू कडू यांनी या चर्चेवर ठोस भूमिका घेतली. शरद पवार आणि अजित पवार हे आधीपासूनच एकत्र आहेत, असा स्पष्ट दावा करत त्यांनी दोघांमधील संभाव्य साटेलोटे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पवारांचे राजकीय टोकणे वेगवेगळी असली, तरी सूत्र एकच हातात आहेत. या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेच या एकत्रिकरणाचा निर्णय घेतील असे म्हटल्यामुळे या चर्चांना अधिक धार आली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी, हे नाटक आहे, कारण ते आधीपासून एकत्र आहेत,असा थेट आरोप केला.
कोकण व मुंबईतील मतदार यादीत नोंद असलेल्या मराठी मतदारांवरही बच्चू कडू यांनी भाष्य केलं. भाजप मुंबईतील मराठी मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी नवीन परिपत्रक आणण्याच्या तयारीत असल्याचा त्यांनी दावा केला. यासाठी मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याचं धोरण राबवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा कृतीतून भाजप मराठी माणसावर औरंगजेबासारखं आक्रमण करत आहे, असं म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. राज्य सरकारने दोन ठिकाणी मतदान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतल्याचाही उल्लेख त्यांनी केला. ही कृती म्हणजे मराठी मतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
Congress : शेतकरी सापडले संकटात, सुलतानांचे सरकार झोपले महालात
आंदोलनाची पुढील रणनिती
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूरमध्ये रक्तदान आंदोलन झालं. हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ झाल्यामुळे विशेष लक्षवेधी ठरलं. राज्यकर्त्यांना बोलते करण्यासाठीच आम्ही हे आंदोलन केलं आहे, असं बच्चू कडू म्हणाले. राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावरच कर्जमाफी जाहीर करणार आहे, कारण मतदार त्यानंतर विसरून जातील, असं स्पष्ट करत त्यांनी सरकारच्या नियतीवर बोट ठेवलं. या सर्व पार्श्वभूमीवर, बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानावर 2 जून रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी दिलेल्या सातबारा कोराच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे एकत्रिकरणाचा निर्णय सोपवल्याचं जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी, सध्या देश प्रथम, युद्धजन्य परिस्थितीला प्राधान्य द्या, असं विधान केलं होतं. मात्र बच्चू कडू यांच्या दाव्यानं या सर्व घोषणांची पोलखोल केल्याचं चित्र सध्या तयार झालं आहे.