राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याच्या निर्णयावरून प्रहारचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मतदान शाळांमध्ये न घेता थेट भाजपच्या कार्यालयातच घ्यावं, अशी टीव्र टीका करत त्यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे.
मतदान शाळेत नको, भाजपच्या कार्यालयातच घ्या, अशा स्पष्ट, कडव्या आणि स्फोटक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राज्य निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन वापरणार नसल्याच्या निर्णयामुळे कडू यांनी संतापाचा आगळा उद्रेक करत लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केला.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलं की डिसेंबर ते जानेवारीदरम्यान राज्यात टप्प्याटप्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असून त्यात व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही. या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात विविध राजकीय पक्षांत नाराजीचे वातावरण पसरले असताना बच्चू कडू यांनी मात्र आपल्या विशिष्ट आक्रमक शैलीत या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
आयोगाच्या भूमिकेवर संशय
बच्चू कडू म्हणाले, जेव्हा व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही, तेव्हा ही निवडणूक शाळेत का घ्यायची? सरळ भाजपच्या कार्यालयातच मतदानाचे ठपके मारा. कारण 2-3 देश सोडले तर जगात कुठेच ईव्हीएम वापरली जात नाही. मग आपण लोकशाहीच्या नावाखाली फक्त एक नाटक का करतो आहोत? त्यांनी जाहीरपणे राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, मतदारांमध्ये विश्वासहानी होण्याचा इशाराही दिला.
या संपूर्ण प्रकरणी ते आयोगाला अधिकृत पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या हक्क आणि न्याय या मुद्द्यांवरही सखोल चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. कडू यांनी स्पष्ट केलं की, ही भेट राजकीय नव्हती, निवडणूक अजेंडा नाही. आमचा अजेंडा आहे शेतकऱ्यांचे अस्तित्व.
भावनिक संवाद
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बच्चू कडू भावनिक झाले. शेतकरी अडचणीत आहे, सरकार मात्र टिंगल करते आहे. दुष्काळ पडल्यावर ते म्हणतात ‘कर्जमाफी मागतात’, ही क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, हे दुःख दुष्काळाहून मोठं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंना विदर्भात येऊन शेतकऱ्यांना थेट संबोधित करण्याची विनंतीही केली.
मुंबईने आंदोलन सुरू असताना एक-दोन तास का होईना, पण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. हा मुद्दा कुठल्याही जाती, धर्माचा किंवा पक्षाचा नाही, हा विषय आहे अस्तित्वाचा, असं ठाम मत मांडत त्यांनी आपल्या आंदोलनाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्या दिवशी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शेतकऱ्यांच्या वेदनांची राखी’ पाठवणार आहोत.
बच्चू कडूंचा हा आक्रमक, थेट आणि धगधगता विरोध हा केवळ एका मशीनविरोधी टीका नसून, लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. त्यांनी केवळ आयोगालाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाही विचार करायला भाग पाडलं आहे, मतदान म्हणजे एक बटन दाबणं नव्हे, तर लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आहे.