महाराष्ट्र

Maharashtra : महायुतीच्या ‘आका’ कारभारावर बच्चू कडूंचा प्रहार

Bacchu Kadu : अजित दादांच्या 'फुसक्या' दादागिरीवर खोचक टोमणा

Post View : 1

Author

बच्चू कडू यांनी राज्यातील कमिशन स्पर्धा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निष्फळतेवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जणू नाटकाचा केंद्रबिंदू बनला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणि त्यांच्या आत्महत्यांच्या वेदनादायी कहाण्या सातत्याने समोर येत असताना, महायुती सरकार मात्र या मुद्द्यावर मौन बाळगून आहे. योग्य वेळी कर्जमाफी करू, असे आश्वासनांचे ढोल सरकारकडून वाजवले जात असले, तरीही ‘योग्य वेळ’ कधी येणार, याची वाट पाहत शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुती सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. सवना येथे शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रेच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. राज्यात सगळीकडे खरेदीचे केंद्रीकरण झाले आहे.

सगळं राज्य स्तरावरूनच खरेदी केलं जातंय आणि त्यातून कमिशनचा खेळ खेळला जातोय, असा गंभीर आरोप कडू यांनी केला. मंत्र्यांचे खिसे भरण्याची स्पर्धा लागली असून, अर्ध्याहून अधिक मंत्री ‘आका’ बनले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे ‘मोठे आका’ असल्याचा थेट हल्ला त्यांनी चढवला. सरकारच्या या कमिशनखोरीच्या खेळात शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र बाजूला पडले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडत आहे. कापसावरील आयात शुल्क कमी केल्याने परदेशातून 150 टन कापूसगाठी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच 27 लाख टन कापूस आयात झाला असून, याचा थेट फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

Nagpur Police : आमदारांनी केले मतांनीच्या निर्णयाचे कौतुक

जातीपातीमध्ये लक्ष विचलित

कापसाचे दर घसरण्याची भीती व्यक्त करताना बच्चू कडू यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर बोट ठेवले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, पण सरकारला त्याची पर्वा नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कडू यांनी मजुरांच्या हक्कांवरही भाष्य केले. हमी योजनेच्या मजुरांचे पैसे सहा महिन्यांपासून थकले आहेत, दिव्यांगांचे अनुदान तीन महिन्यांपासून रखडलंय, श्रावणबाळ योजनेचे पैसेही चार महिन्यांपासून अडकलेत. पण मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार मात्र वेळेवर होतात, असा टोमणा त्यांनी मारला. सरकारच्या या दुटप्पी वागणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कडू यांनी जोरदार टीका केली. मी विधानसभेत थकीत अनुदानाचा मुद्दा मांडला, तेव्हा अजित दादांनी वित्त सचिवांचे वेतन थांबवण्याची गर्जना केली. पण ती दादागिरी फुसकी निघाली.

रेती आणि मुरमाच्या व्यवहारात दादागिरी चालते, पण शेतकरी आणि शेतमजूरांच्या हक्कांसाठी ती का दिसत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दादांना रंगबाजी कुठे आणि कशी करायची, हे अजून कळलंच नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. शेवटी, कडू यांनी सरकारवर शेतकऱ्यांचे प्रश्न टाळण्यासाठी जातीपातीचे वाद निर्माण केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून सरकार जातीपातीच्या वादात अडकवत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावरही त्यांनी टीका करत, हा नेपाळचा परिणाम आहे, अशी खोचक टिप्पणी केली. बच्चू कडू यांच्या या सडेतोड टीकेने महायुती सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Vijay Wadettiwar : दहा ऑक्टोबरला नागपूरच्या रस्त्यावर ओबीसींचा हुंकार

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!