शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गुरुकुंज मोझरीपासून बारामती ते नागपूरपर्यंत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.
शिक्षकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आणि शासनाचा निष्क्रिय प्रतिसाद यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनाची ठिणगी पेटवली. शिक्षकांच्या उपस्थितीत शासनाने काढलेल्या अन्यायकारक निर्णयाची होळी करत बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद शाळांवरील अन्याय थांबवण्याची मागणी केली.
राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागातून काढलेला जीआर रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. हा निर्णय जिल्हा परिषद शाळांवरील गंडांतर असून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर थेट घाव आहे. हा शासन निर्णय मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमालाही छेद देणारा आहे. सरकारने हा आदेश त्वरित मागे घ्यावा, असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी दिला.
कर्जमाफीचा विसर
राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावरही बच्चू कडू संतप्त झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असल्याचा भावनिक आव आणत सत्ता मिळवली गेली. मात्र सत्तेत आल्यानंतर कोणताही पक्ष या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. शासनाच्या या वागणुकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. आत्महत्या करीत आहे. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे गंभीर वास्तव सरकारी अहवालच सांगत आहेत.
कर्जमाफीच्या विस्मरणावरून आता बच्चू कडू मैदानात उतरले आहे. 2 जूनपासून अर्थसंकल्प वाचन आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर हे आंदोलन सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोरही आंदोलन करण्यात येणार आहे. शेवटचा टप्पा नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून संपवण्यात येणार आहे.
आमरण उपोषण
बच्चू कडू 7 जुलैपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे किंवा त्यांच्या जन्मगावी असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण सुरू करणार आहेत. तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावरूनच या लढ्याला सुरुवात करून सरकारच्या निष्क्रियतेविरोधात निर्णायक टप्पा गाठण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडू यांची ही भूमिका केवळ आंदोलनापुरती मर्यादित नाही. ग्रामीण भागातील शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात न्याय मिळवून देण्यासाठीचा ध्यास आहे. शासनाच्या भूमिकेला बदलण्यास भाग पाडणारा हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.