यवतमाळमध्ये सातबारा कोरा आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवला आहे. सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी स्वाभिमानाची लढाई सुरु केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सुरु असलेल्या सातबारा कोरा पदयात्रेतून बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या या आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडू यांनी थेट टीका केली. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरु झालेल्या या निर्णायक आंदोलनाने यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य मिळावे या प्रमुख मागण्यांसह सुरु असलेल्या या पदयात्रेत राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ येथून सुरू झालेली ही यात्रा आता शेतकरी आत्मसन्मानाचा प्रतीक ठरत आहे.
Sambhaji Brigade : प्रवीण गायकवाड हल्ल्यावर शिवभक्तांचे आक्रमक प्रत्युत्तर
बंडखोरीचे राजकारण
अंबोडा येथे आयोजित सभेत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर रोखठोक शब्दात टीका करत पक्ष आणि चिन्ह घेऊन जाण्याच्या त्यांच्या निर्णयाला विरोध केला. बंडखोरी ठीक होती. मात्र पक्ष आणि चिन्ह यांची लूट अयोग्य होती, असे ठामपणे मांडून बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अधिक धार दिली. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या या यात्रेत शेतकऱ्यांनी डोळ्यांवर काळी पट्टी, हातात विळा आणि रूमण घेऊन शासनाच्या असंवेदनशीलतेचा जाहीर निषेध केला आहे.
सात दिवसांच्या प्रवासात शेतकरी आंदोलकांनी शेतीकर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे दरमहा अर्थसहाय्य यांसह मेंढपाळ आणि मच्छीमार समुदायाच्या मागण्यांचा पुन्हा पुनरुच्चार केला. यावेळी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कुटुंबे उध्वस्त होत असून सरकार आंधळं आणि बहिरं असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
Ashish Deshmukh : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोठावला विधिमंडळाचा दरवाजा
शेती हक्कांसाठी संघर्ष
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याचे अंतिम टप्पे आता अधिक आक्रमक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अंबोडा येथे आंदोलनाचा टप्पा संपल्यानंतर त्यांनी जाहीर केले की हे आंदोलन केवळ मागण्या पूर्ण करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी चाललेला संघर्ष आहे. महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षम धोरणांवर सडकून टीका करताना कडू यांनी पुढील टप्प्यात सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे.
यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आगामी 24 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. त्या दिवशी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांप्रती जागृती निर्माण करण्याचा निर्धार करत बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपला आक्रमक भूमिका स्पष्ट केली.