
मंत्रिपद न मिळाल्यानं युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा रुसले होते. त्यानंतर ते नागपुरातून अमरावतीला निघून गेले होते. राग शांत झाल्यानंतर राणा पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परतले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांचा पत्ता कापण्यात आला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राणा दाम्पत्य मंत्रिपदासाठी धडपड करीत होते. निकाल लागताच माजी खासदार नवनीत राणा या देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘सागर’वर गेल्या होत्या. त्यांच्यानंतर रवी राणा हे देखील फडणवीस यांना भेटले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात रवी राणा यांच्या नावाने फलक लागले. या फलकांवर रवी राणा हे कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी रवी राणा यांचा पोपट झाला.
रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेच नाही. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशनात रवी राणा यांचं डोकं तापलं. अधिवेशन सोडून रवी राणा अमरावतीत निघुन आले. लोकसभा निवडणुकीतही राणा दाम्पत्याचं हसू झालं होतं. ‘एक्टिझ पोल’च्या सर्वेक्षणावर अंधविश्वास ठेवत राणा यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अमरावती अशीच फलकबाजी केली होती. त्यात नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं होतं. मात्र मतमोजणी झाली, त्यावेळी राणा यांची विकेट पडली.

जिना यहाँ, मरना यहाँ; राणाजी जाना कहाँ
अमरावतीत रवी राणा आणि नवनीत राणा यांची अवस्था सध्या ‘जिना यहाँ, मरना यहाँ; राणाजी जाना कहाँ’ अशी झाली आहे. सगळ्याच नेत्यांचा विरोध पत्करत भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात घेतलं आहे. त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक करण्यात आलं. राणा हे संधीसाधू असल्याचं ठाऊक असतानाही त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलं. राणा यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या तुषार भारतीय या एकनिष्ठ कार्यकर्त्याला भाजपमधून निलंबित करण्यात आलं. अशात केवळ मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून राणा नागपुरातून निघून गेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी पंगा घेण्यात काहीच पॉइंट नसल्याचं उशिरानं का होईना राणा यांच्या लक्षात आलं. त्यामुळं ते पुन्हा ‘देवा’घरी परतले आहेत.
शिवसेनेत उद्धव ठाकरे राणा दाम्पत्यावर दात खावून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही राणा यांचं राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अमरावतीत यशोमती ठाकूर, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ, सुलभा खोडके राणा यांच्या विरोधात तलवार उपसून तयार आहेत. राणा यांचे नटबोल्ट टाइट करण्यासाठी त्यांचाच ‘पाना’ कसा वापरता येईल, याच्या तयारीत ते आहेत. सर्व परिस्थिती विरोधात असताना केवळ ‘देवा’चा आशीर्वाद असल्यानंच राणा तरलेले आहेत. सत्ताधारी वर्तुळात आहे. त्यामुळं ‘देवा’शी पंगा घेऊन चालणार नाही, हे राणा यांना ठाऊक आहे. परिणामी पुन्हा एकदा ते देवघरात लोटांगण घेण्यासाठी पोहोचल्याचं दिसत आहे.