राज्यातील बंजारा, लमाण आणि लभाणा समाजाच्या तांड्यांना अखेर स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुली गावाचा मान मिळाला आहे. संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारने ऐतिहासिक परिपत्रक जारी करत ही मंजुरी दिली.
कधी नव्हे ते घडलं..! ज्यांच्या अस्तित्वासाठी केवळ धुरकट वाटा, धुळकट आशा आणि सरकारी योजनेच्या वेशीवर थांबलेल्या आशाळभूत नजरा होत्या. त्या बंजारा, लमाण आणि लभाणा समाजातील तांड्यांना आता नवी ओळख, नवा दर्जा, नवा हक्क मिळाला आहे, ‘गाव’ म्हणून. या ऐतिहासिक क्षणामागे खंबीर नेतृत्व, सातत्याने संघर्ष आणि असंख्य लोकांच्या आशांचा भार खांद्यावर घेतलेला एक नेता ठामपणे उभा राहिला. ते म्हणजे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड.
राज्यातील विविध भागांतील तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत व महसुली गावाचा दर्जा देण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शासनाने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. 4 ऑगस्ट 2025 रोजी परिपत्रक काढून ही प्रक्रिया मान्य करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड म्हणाले, मला मनापासून समाधान वाटतंय. हा केवळ एक निर्णय नाही, तर एका संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे.
सकारात्मक प्रतिसाद
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून बंजारा, लमाण आणि लभाणा समाजासाठी तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठामपणे मांडल्या होत्या. स्वतंत्र ग्रामपंचायतींची मान्यता, तांड्यांची स्वतंत्र घोषणा आणि महसुली गावाचा दर्जा. या तीनही मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषदांना याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
राठोड यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की, या निर्णयामुळे आता बंजारा तांड्यांना थेट योजनांचा लाभ मिळणार आहे. शाळा, रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत ही अत्यंत गरजेची होती आणि आज ती प्रत्यक्षात आली आहे. हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही, तर सामाजिक न्यायाचं मोठं पाऊल आहे.
विकासाच्या प्रवाहात सामील
गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या राठोड यांची जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक लढा अखेर यशस्वी ठरला आहे. या निर्णयामुळे समाजाच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या उपेक्षा आणि दुर्लक्षिततेला आत्ता पूर्णविराम मिळणार आहे. विकासाच्या झोतात न आलेले तांडे आता शाश्वत विकासाच्या प्रवाहात सामील होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
हा निर्णय म्हणजे केवळ एका समुदायाच्या मागण्या पूर्ण झाल्या इतकाच मर्यादित नाही, तर ही एक सामाजिक क्रांती आहे, जी गावपातळीपासून शासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत बदल घडवण्याची क्षमता ठेवते. या सगळ्या प्रक्रियेत संजय राठोड यांचे नेतृत्व, त्यांची भुमिका आणि समाजावरील निष्ठा सर्वार्थाने उठून दिसते. बंजारा समाजाच्या स्वाभिमानाचा हा विजय आहे. ज्याला राठोड यांच्या जिद्दीच्या होरपळीतून न्यायाची दिशा मिळाली. ही बातमी केवळ आजची नाही, तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.