महाराष्ट्र

Akola : ठाणेदाराने आमदारालाच घातल्या शिव्या

Murtizapur : हरीश पिंपळे यांची गृहखात्याकडे तक्रार

Share:

Author

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना ठाणेदाराने फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे प्रकरणाने मोठं वळण घेतलं आहे.

अकोल्यातील राजकीय आणि पोलिस वर्तुळात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार पिंपळे यांनी स्वतःच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ठाणेदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

हा सगळा प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराच्या संदर्भात. आमदार पिंपळे यांचेच एक कार्यकर्ते, हरीश वाघ यांनी पोलिसांना माहिती दिली होती की, काही संशयित व्यक्ती कत्तलीसाठी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करत आहेत. पोलिसांनी ही माहिती मिळाल्यावर संबंधित वाहन पकडले. मात्र काही पैशांचा व्यवहार झाल्यानंतर पोलिसांनी ते गुरांचे वाहन परस्पर सोडून दिले.

अपमानास्पद भाषा

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आमदार पिंपळे यांनी स्वतः बार्शीटाकळीचे ठाणेदार यांना फोन केला. पण त्या संवादात ठाणेदाराने आमदारांनाच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पिंपळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या फोन कॉलचा ऑडिओ क्लिपही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती भाजप आमदाराला अत्यंत अपमानास्पद भाषेत बोलताना स्पष्ट ऐकू येत आहे.

Mahayuti : महावितरणच्या हलगर्जीपणाने आर्थिक ताळेबंद हादरला  

शिवीगाळ झाल्याच्या या प्रकारामुळे संतप्त झालेले आमदार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप पाठवून कडक शब्दात ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी केली आहे. आमदारासोबत जर पोलीस अधिकारीच असा वागत असेल, तर राजकीय क्षेत्रातील लोकांची प्रतिष्ठा राहणार नाही. यावर तातडीची आणि उदाहरण ठेवणारी कारवाई झाली पाहिजे, असे आमदारांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 

तक्रारीत आणखी नमूद करण्यात आलं आहे की, पोलिसांकडे माहिती दिल्यानंतरही गुरांची तस्करी थांबवण्याऐवजी पैशांसाठी अशा घटनांना पाठीशी घातली जात आहे. असे असेल तर कायद्याच्या रक्षणासाठी नेमले गेलेले पोलिसच कायदा तोडणाऱ्यांना मदत करत असल्याचा संशय बळावतो. या प्रकरणावरून आता पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि राजकीय प्रतिनिधींचा सन्मान कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावलं उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत भूमिका पोलीस विभागाकडून अद्याप समोर आलेली नाही. आता लक्ष गृहमंत्रालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर खरंच कारवाई होते का, की हे प्रकरणही इतर अनेक प्रकरणांप्रमाणे कालांतराने गिळंकृत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!