
भंडाऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 100 कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण झाले. ज्यामुळे शहराला नवा बायपास व सुरक्षित रस्ता मिळणार आहेत.
भंडाऱ्याच्या विकासाच्या वाटचालीत 5 जुलै 2025 हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 100 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील नागरिकांसाठी दिलासा देणाऱ्या अनेक रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. विशेषतः बायपास रस्त्यांमुळे अपघातांची संख्या कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुसह्य होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. या लोकार्पण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हा केवळ सरकारी कार्यक्रम नव्हता, तर एका संघर्षाच्या पाठपुराव्याचे फळ होते. या संघर्ष मागणीच्या मागे होते भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे.
रस्त्याची मागणी भंडाऱ्यात अनेक वर्षांपासून होती. माझ्या खासदारकीच्या सुरुवातीपासून या प्रकल्पासाठी मी संघर्ष केला. आज तो साकार होताना पाहणं, हे माझ्यासाठीही एक भावनिक आणि महत्त्वाचा क्षण आहे, असं माजी खासदार सुनील मेंढे म्हणाले. भंडाऱ्यातला मुख्य रस्ता शहराच्या मध्यभागातून जात असल्यामुळे रहदारीचा अत्यंत ताण जाणवत होता. अपघातांचे प्रमाण वाढत होते. हा रस्ता केवळ रहदारीचा नव्हता, तर धोकादायक ठरला होता. त्यामुळे त्याला बायपासची गरज होती. ती पूर्ण झाली आहे, असं स्पष्ट करत मेंढेंनी गडकरी यांच्या सहकार्याची भरभरून स्तुती केली.

डीपीआर काम प्रलंबित
नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला केवळ मंजुरी दिली नाही. तर तीन वर्षांपूर्वी भूमिपूजनही केलं आणि आता लोकार्पणही त्यांच्या हस्तेच झाले. हीच विकासाची साखळी आहे, असं ते म्हणाले. या महामार्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो वैनगंगा नदीच्या पात्रातून जातो. त्यामुळे पाण्यात 30-40 फुटांपर्यंत बांधकाम करणे हे एक मोठे आव्हान होते. दरवर्षी पूर येतो, अडचणी येतात पण इंजिनिअरिंग टीमनं आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आव्हान पार पाडलं असे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी हे केवळ मंत्री नाहीत, तर एक खरे मार्गदर्शक आहेत. त्यांनी संपूर्ण देशात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर रस्ते विकासाचे नवे मॉडेल उभे केले आहे.
नितीन गडकरी यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत, असं म्हणताना सुनील मेंढे यांनी गडकरींच्या नेतृत्वाची वैशिष्ट्य ठळकपणे मांडली. लाखनीचा पूल असो किंवा साकोलीचे प्रकल्प, नितीन गडकरी यांनी प्रत्येक कामाला संमती दिली, हेही त्यांनी सांगितले. भंडाऱ्याला त्यांनी नेहमीच आपलंसं मानलं आहे. त्यामुळेच माझ्या मागण्यांकडे त्यांनी तातडीने लक्ष दिले. अजूनही एक काम बाकी आहे. ते म्हणजे भंडाऱ्यातील जुन्या रस्त्याचा डीपीआर तयार आहे. पण प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. मी त्या काम सुरू होण्याची विनंती केली आहे. हा प्रकल्प सुरू झाला, तर भंडाऱ्याचा चेहरामोहराच बदलून जाईल, असं स्पष्ट करत मेंढेंनी आगामी विकासाचा नकाशाही लोकांसमोर मांडला.