राज्यात लवकरच स्थानिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भंडारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांवर प्रशासकांचे राज्य आहे. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली भंडाऱ्यातील नगरपरिषदेसमोर एक भव्य जनसुनावणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधले.
आंदोलनात सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी चरण वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांवर नगरसेवक किंवा कार्यकारिणी नाही. यामुळे नागरिकांचे प्रश्न ऐकणारे कोणीच नाही. त्यांच्या समस्यांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीत चरण वाघमारे यांनी जनसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी हे अनोखे आंदोलन आयोजित केले. आम्ही इथे तुमच्या समस्या ऐकण्यासाठी आलो आहोत, कारण आमदार-खासदारांना वेळ नाही. ते सांगतात की महाराष्ट्रात रामराज्य आहे. पण खरे रामराज्य तर तेव्हाच येईल, जेव्हा प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, असे वाघमारे यांनी ठणकावून सांगितले.
नागरिकांच्या समस्यांना वाचा
जनसुनावणी आंदोलनात चरण वाघमारे यांनी नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याचे खुले आवाहन केले. दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या आंदोलनात पाण्याचा प्रश्न, जमिनीशी संबंधित तक्रारी, वीज पुरवठ्याच्या समस्या, तसेच लाडक्या बहिणींसह विविध योजनांबाबत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रत्येक तक्रारीकडे लक्ष देऊन वाघमारे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. तुमच्या प्रत्येक समस्येची दखल आमच्या पक्षाकडून घेतली जाईल. आम्ही तुमचा आवाज विधान परिषदेत पोहोचवू. या आंदोलनाने भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला एक नवी दिशा दिली आहे.
चरण वाघमारे यांनी केवळ आंदोलनापुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या समस्यांना विधान परिषदेत मांडण्याचे ठाम आश्वासन दिले. रामराज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत नव्हत्या. नागरिकांच्या समस्या सुटत होत्या. आम्ही तेच खरे रामराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहता, शरद पवार गटाने निवडणुकीपूर्वीच आपली ताकद दाखवून दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील हे जनसुनावणी आंदोलन केवळ राजकीय रणनीतीच नव्हे, तर नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला आहे. चरण वाघमारे यांनी या आंदोलनाद्वारे सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. आगामी निवडणुकीत या आंदोलनाचा प्रभाव कसा दिसेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
