
भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. दोन कार्यकर्त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे.
राजकारण हे बदलाचे दुसरे नाव असले तरी काही प्रसंग संपूर्ण राजकीय नकाशा हादरवून टाकतात. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात असेच काही घडले आहे. काँग्रेसचा मजबूत गड समजला जाणारा भाग अचानकपणे भाजपच्या रंगात रंगून गेला आहे. भंडारा जिल्ह्यातील मौजा सावरी मुरमाडीचे माजी सरपंच भागवत बिसन नान्हे आणि संजीवनी भागवत नान्हे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसला रामराम करत 25 एप्रिल रोजी रात्री भाजपमध्ये जोरदार एन्ट्री घेतली. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षप्रवेश करणाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतले. आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी नव्या आशा आणि अपेक्षांनिशी सुरुवात केली. विशेष म्हणजे, हा मोठा राजकीय भूकंप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात घडला आहे. या भागात काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा प्रभाव असतानाही, आता त्यांचेच समर्थक गोंधळलेले दिसत आहेत. काँग्रेसला नव्याने आत्मपरीक्षणाची गरज भासू लागली आहे. कारण ही फक्त एखाद्या व्यक्तीची भूमिका नसून संपूर्ण तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणारी निर्णायक घटना ठरू शकते. हाथ से हाथ छोड़ो हे काँग्रेसचे अभियान आता कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि भाजपचा प्रचारक बनले.
नेत्यांचा बदललेला मोर्चा
काही दिवसांपूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या आणखी एका गडाला तडा गेला होता. राहुल ठवरे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. हा पक्षप्रवेश सुद्धा डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या दोन्ही घटनांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची गोची झाली आहे. काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचे पडसाद आता थेट पक्षातून बाहेर पडण्यात दिसू लागले आहेत. डॉ. परिणय फुके यांच्या संघटनात्मक ताकदीने भाजपने काँग्रेसच्या गडांवर जोरदार आघात केला आहे.
भाजपने आपली रणनिती काटेकोरपणे राबवत काँग्रेसचे पारंपरिक मतदार, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात खेचायला सुरुवात केली आहे. डॉ. परिणय फुके यांचे नेतृत्व आता फक्त भंडारा-गोंदियापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर राज्यातील काँग्रेसच्या गडांवरही त्यांनी मोर्चा वळवलेला दिसतोय. राजकीय दृष्टिकोनातून बघितले तर ही घटनाक्रम एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. काँग्रेससाठी आता केवळ प्रचार नव्हे, तर अंतर्गत संघटनात्मक बांधणीवर नव्याने काम करण्याची वेळ आली आहे.