
भंडारा-गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखून प्रभावी प्रचार मोहीम सुरू केली आहे.
विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीइतकीच सहकार विभागातील निवडणूक देखील महत्त्वाची असते. सहकार क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी जिल्हा बँक बजावत असतात. त्याच्यामुळे जिल्हा बँकेतील सहकार क्षेत्रावर आपलं वर्चस्व असावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय चढाओढ सुरू आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सहकार क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व कायम राहावे याच्यासाठी धडपड करत असते. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये या सगळ्यांना भाजपने धोबीपछाड दिला आहे.
भंडारा-गोंदिया जिल्हा सहकार बँकेची निवडणूक लवकरच होणार आहे. ही निवडणूक पूर्व विदर्भातील सहकार विभागात मोलाची मानली जाते. यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे या निवडणुकीसाठी पुढे सरसावले आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपलं अबाधित वर्चस्व कायम राखणारे डॉ. परिणय फुके यांनी जिल्हा सहकारी बँक महायुतीकडे राहावी यासाठी व्यूहरचना आखली आहे. नुकतीच यासंदर्भात त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे ठरले.

आर्थिक शिस्तीचा आग्रह
मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने मतदार गटांचे पुनर्गठन, समन्वय साधणे आणि स्थानिक पातळीवर सशक्त जाळे निर्माण करणे यावर भर देण्यात आला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सहकार व्यवस्थेतील सच्चेपणाचे आणि आर्थिक शिस्तीचे महत्त्व प्रमाणित करण्यात आले. डॉ. परिणय फुके यांनी या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी एक व्यापक आणि व्यावसायिक नियोजन आखले आहे. सहकार व्यवस्थेत केवळ सत्ता नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य हितसंबंधितांचा विश्वास मिळवणे हे खरे यश आहे, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
निवडणुकीत महायुती एकजूट, नियोजनबद्धता आणि शिस्तीच्या जोरावर मैदानात उतरणार आहे. सहकार बँक ही केवळ एक संस्था नसून ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे, हे लक्षात घेऊन महायुतीने या लढतीला सर्वतोपरी गांभीर्याने घेतले आहे. आर्थिक पारदर्शकता, कर्जवाटपातील शिस्त, आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कार्यक्षम बँकिंग हे उद्दिष्ट ठरवले गेले आहे. या नियोजन बैठकीला अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. भाजप आणि महायुतीने भंडारा-गोंदिया जिल्हा सहकार बँक निवडणुकीत विजयासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. आगामी काळात ही निवडणूक केवळ सहकाराचीच नव्हे, तर राजकीय प्रतिष्ठेचीही ठरणार आहे, हे निश्चित आहे.