माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास मागे असल्याची खंत व्यक्त करत लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून येथील उद्योगांसाठी सहाय्य सुरू केले.
विदर्भाच्या मातीतून उभे राहिलेले भंडारा-गोंदिया हे जिल्हे नेहमीच विकासाच्या बाबतीत मागे राहिल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. पण या मागासलेपणाला आव्हान देण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुढे सरसावले आहे. ते म्हणजे भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. त्यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यात लघु उद्योग भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त एका नव्या ऊर्जेचा संचार झाला. या कार्यक्रमात त्यांनी भंडारा-गोंदियाला वैनगंगाच्या वेगाने उद्योग विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार व्यक्त केला. लघु उद्योग भारती ही देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची (MSME) एकमेव अखिल भारतीय संघटना आहे. आता ती भंडाऱ्यात नव्या जोमाने सुरू झाली आहे. डॉ. फुके यांनी या कार्यक्रमात आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. विदर्भ हा महाराष्ट्रातील इतर प्रदेशांच्या तुलनेत नेहमीच मागे राहिलाय. त्यातही भंडारा-गोंदिया हे जिल्हे विकासाच्या शर्यतीत कायम शेवटी दिसतात, असं ते म्हणाले.
परंतु त्यांनी हार मानलेली नाही. त्यांच्या शब्दांतून एक आशेचा किरण दिसतोय. लघु उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा त्यांचा संकल्प आहे. लघु उद्योग हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहेत. रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि ग्रामीण भागातील प्रगतीसाठी हे उद्योग महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. लघु उद्योग भारतीच्या या नव्या सुरुवातीला स्थानिक उद्योजकांसाठी आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. डॉ. फुके यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल मंत्राला हाताशी धरत स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. आता वेळ आली आहे, की आपण एकजुटीने भंडाऱ्याच्या प्रगतीसाठी काम करायचे. स्थानिक स्तरावर उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि नव्या संधी निर्माण करायच्या, असे आवाहन त्यांनी केले.
Maharashtra Government : भंडारा जिल्ह्याला इम्पोर्टेड पालकमंत्र्यांचे वरदान
स्थानिक संसाधनांचा विकास
कार्यक्रमाला लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रकाशचंद्र गुप्ता, संघचालक पंकज हाउगे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बलदेव प्रजापती, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित घैसास यांसारखे दिग्गज उपस्थित होते, ज्यांनी या नव्या सुरुवातीला बळ दिले. डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदियातील उद्योगांच्या मागासलेपणाचे मूळ कारण शोधले. कामगार कायद्यांमधील जाचक अटी आणि शासकीय परवानग्यांचा गुंता. एखादा उद्योग सुरू करायचा तर जागा घेण्यापासून ते बँक कर्ज मिळवण्यापर्यंत सर्व काही तारेवरची कसरत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपला राजकीय अनुभव सांगताना सांगितले की, आमदार असताना शासकीय परवानग्या मिळवणे ही खूप कठीण प्रक्रिया आहे. त्यामुळे लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला.
भंडारा-गोंदियात लघु उद्योग भारतीला पोहोचायला 31 वर्षे लागली. पण आता ही संस्था येथील उद्योजकांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे निराकरण करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. गोंदिया हे व्यापारी शहर असूनही तिथे मोठे उद्योग किंवा प्रकल्प नसल्याने स्थानिक नागरिकांना दुसरीकडे स्थलांतर करावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भंडारा-गोंदियात लोकसंख्या कमी होत आहे, कारण इथे रोजगाराच्या संधी नाहीत. डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदियातील स्थानिक संसाधनांचा उल्लेख करताना सांगितले की, इथे तांदूळ, मक्का आणि दूध मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. यावर आधारित प्रोसेसिंग युनिट्स उभारली तर विकासाला नवी दिशा मिळेल. त्यांच्या या दूरदृष्टीचे कौतुक होत आहे. भंडारा-गोंदियातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी ही एक मोठी संधी आहे. आम्ही गोंदिया आणि साकोली येथेही लघु उद्योग भारतीच्या शाखा सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ. फुके यांच्या नेतृत्वाखाली भंडारा-गोंदियात लघु उद्योगांना चालना देण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांनी व्यक्त केलेली खंत आणि त्याचबरोबर दाखवलेला आशावाद येथील उद्योजकांना नवी प्रेरणा देईल. विदर्भातील गडचिरोलीला स्टील हब मिळाले, नागपूरला आयटी हब आहे. पण भंडारा-गोंदियाला काहीच नाही, असे सांगत त्यांनी येथील मागासलेपणावर बोट ठेवले. पण त्याचवेळी, लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून ते या जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहेत.
